अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar
मागील वर्षी 2023 मध्ये पिक विमा योजनेत सहभागी झालेल्या आणि पावसाअभावी नुकसान झालेल्या शेतकर्यांना विमा योजनेचा लाभ देण्यास सुरूवात झाली आहे. नगर जिल्ह्यात यापूर्वीच सोयाबीन आणि मका पिकाच्या नुकसानीपोटी 25 टक्के भरपाईच्या रक्कम, तसेच पिका विम्याचा लाभ मंजूर झाला आहे. यामुळे आता खरीप हंगाम 2023 मधील उर्वरित आठ पिकांच्या विमा भरपाईकडे शेतकर्यांच्या नजरा लागल्या असून येत्या 15 दिवसात ही रक्कम शेतकर्यांना मिळण्याची शक्यता कृषी विभागाच्या सुत्रांकडून वर्तवण्यात आली आहे.
नगर जिल्ह्यात खरिप हंगाम 2023 मध्ये राज्य सरकार आणि मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या पुढाकारातून एक रुपयात पिक विमा योजना राबवण्यात आली. या योजनेत खरीप 2023 मध्ये एकट्या नगर जिल्ह्यातून 5 लाख 67 हजार शेतकर्यांनी 11 लाख 80 हजार पिक विम्याचे अर्ज दाखल केले होते. या पिक विमा योजनेत सोयाबीन, मका यासह मूग, उडिद, बाजारी, भात, तूर, कपाशीसह दहा पिकांचा समावेश होता. पावसाअभावी खरीप हंगामातील ही पिके वाया गेल्याने शेतकर्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले होते.
यामुळे जिल्हाधिकारी सिध्दराम सालीमठ यांनी 3 सप्टेंबर 2023 अध्यादेश काढत जिल्ह्यातील सर्वच तालुक्यात बाधित शेतकर्यांना विमा रक्कमेच्या 25 टक्के रक्कम आग्रीम देण्याचे आदेश काढले होते. यानूसार नगर जिल्ह्यात शेतकर्यांना पहिल्या टप्प्यात सव्वा दोन कोटींच्या जवळपास पिक विम्याच्या 25 टक्के अग्रीम पोटी भरपाई मिळाली होती. यात सोयाबीन आणि मका पिकांचा समावेश होता. आता या दोनही पिकांची 100 टक्के बाधित रक्कम शेतकर्यांना मिळण्याचा मार्ग मोकळा झाला असून पीक कंपनी एकूण 1 हजार 167 कोटी रुपये इतकी नुकसान भरपाई मंजूर केलेली आहे. यात अकोले तालुका 47.367 कोटी, संगमनेर 128.98 कोटी, राहाता 121.22 कोटी, श्रीरामपूर 69.56 कोटी, नेवासा 87.94 कोटी, कोपरगाव 79.59 कोटी, राहुरी 103.35 कोटी, पाथर्डी 75.64 कोटी, पारनेर 123.01 कोटी, नगर 65.53 कोटी, शेवगाव 9.77 कोटी, श्रीगोंदा 48.78 कोटी, कर्जत 93.85 कोटी, जामखेड 74.51 कोटी रुपये इतकी भरपाई मंजूर झाली आहे.
आता खरीप हंगाम 2023 मधील सोयाबीन आणि मका वगळून उर्वरित राहिलेल्या मूग, उडिद, बाजारी, कपाशी, भात, तूर यासह आठ पिकांची विमा भरपाईची रक्कम येत्या 15 दिवसात मंजूर शेतकर्यांना मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. याबाबत कृषी विभागाकडे विचारणा केली असता त्यांनी त्यास दुजोरा दिला आहे. लवकरच विमा कंपनीकडून तालुकानिहाय शेतकरी आणि विमा भरपाईची रक्कमेची माहिती मिळणार असल्याचे सांगण्यात आले.
यंदाही 1 रूपयात !
दरम्यान, यंदा देखील शेतकर्यांना 1 रुपयात पिक विमा योजनेत सहभागी होता येणार आहे. आतापर्यंत या योजनेत 3 लाख 53 जार शेतकर्यांनी 7 लाख 72 हजार पिका विमा अर्ज दाखल केलेले असून सोमवारी (दि.15) पिक विम्यासाठी अर्ज दाखल करण्याची शेवटची मुदत असून मागील वर्षीच्या तुलनेत यंदा जिल्ह्यात पावसाचे प्रमाण समाधानकारक असल्याने नेमके किती शेतकरी विमा योजनेत सहभागी होणार हे मंगळवारी (दि.16) स्पष्ट होणार आहे.