Thursday, May 23, 2024
Homeनगरयंदा तिप्पटीने वाढले पीक विमाधारक शेतकरी

यंदा तिप्पटीने वाढले पीक विमाधारक शेतकरी

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

राज्यातील शेतकर्‍यांचा पीक विमा भरण्यासाठी पहिल्यांदाच राज्य सरकारने जबाबदारी घेतली. सरकारच्या या योजनेतून एक रुपयामध्ये शेतकर्‍यांना आपल्या शेतातील उभ्या पिकाचा विमा उतरवता येणार आहे. यात आतापर्यंत नगर जिल्ह्यातून 6 लाख 45 हजार बिगर कर्जदार आणि 15 हजार 527 कर्जदार शेतकर्‍यांनी अशा 6 लाख 61 हजार शेतकर्‍यांनी पीक विमा उतरवला आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा तिप्पट विमाधारक शेतकरी वाढले आहेत. मागील वर्षी 2 लाख 24 हजार शेतकर्‍यांनी पंतप्रधान पीक विमा योजनेत विमा उतरवला होता.

- Advertisement -

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून पीक विमा भरण्यासाठी सरकारची वेबसाईट योग्यप्रकारे चालत नसल्याने शेतकर्‍यांना पीक विमा भरण्यासाठी अडचणींचा सामना करावा लागत आहे. यावर्षी पहिल्यांदाच एक रुपयात पीक विमा भरून घेतला जात असल्याने सर्वच शेतकरी पीक विमा भरण्यासाठी पुढाकार घेत आहेत. त्यामुळे, सर्वच सीएससी सेंटरवर शेतकरी पीक विमा भरण्यासाठी गर्दी करत असले तरी, दुसरीकडे मात्र पीक विमा भरण्यासाठीची वेबसाईट सतत हँग होत असल्याने शेतकर्‍यांना दिवस-दिवस सीएससी सेंटरवर बसून राहावं लागत आहे. पीक विमा भरण्यासाठी 31 जुलै ही शेवटची तारीख असून या तारखेच्या आत शेतकर्‍यांना पीक विमा भरावा लागणार आहे.

नगर जिल्ह्यात आतापर्यंत 6 लाख 45 हजार बिगर कर्जदार आणि 15 हजार 527 कर्जदार शेतकर्‍यांनी अशा 6 लाख 61 हजार शेतकर्‍यांनी पीक विमा उतरवला आहे. या तुलनेत गतवर्षी 1 लाख 99 हजार 71 बिगर कर्जदार आणि 24 हजार 155 कर्जदार शेतकर्‍यांनी या विमा योजनेत सहभाग घेतला होता. यंदा राज्य सरकारने विम्यात सहभागी होणार्‍या शेतकर्‍यांचा 1 रुपया आणि उर्वरित राज्य सरकार आणि केंद्र सरकार हे लाभार्थी हिस्सा भरणार आहेत. विम्यापोटी नगर जिल्ह्यातील शेतकर्‍यांचा राज्य सरकारने 152 कोटी तर केंद्र सरकारने 97 कोटी 98 लाख रुपये असा 251 कोटी रुपयांचा लाभार्थी हिस्सा भरलेला आहे. यंदाच्या पीक विमा योजनेत 91 टक्के अल्पभूधारक, 5.64 अत्यल्प भूधारक आणि 3.36 टक्के मोठ्या शेतकर्‍यांनी विमा योजनेत सहभाग घेतला असून 80 टक्के पुरूष तर 20 टक्के महिला शेतकर्‍यांचा यात समावेश आहे.

पीक विमा काढण्यासाठी शेतकर्‍यांच्या चकरा

राज्यामध्ये एकूण एक कोटी 47 लाख शेतकरी आहेत. यापैकी एक कोटी 17 लाख शेतकर्‍यांनी आपल्या शेतातील उभ्या पिकाचा विमा उतरवला आहे. आणखी शेतकरी पीक विमा भरण्यासाठी रोज सीएससी सेंटरच्या चकरा मारत आहेत. राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी मात्र एकही शेतकरी पीक विमा भरण्याविना राहणार नाही, असे आश्वासन सभागृहात दिलेले आहे.

पीक विमा शेतकर्‍यांचा एकमेव आधार

जून महिन्यात हुलकावणी देणार्‍या पावसाने अखेर जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात सर्वदूर दमदार हजेरी लावली खरी मात्र, अद्याप राज्यातील बहुतांश भागातील पाण्याचा साठा वाढलेला नाही. अशा परिस्थितीमध्ये हवामानाचा फटका शेतीला बसलाच तर, पीक विमा एकमेव आधार शेतकर्‍यांना असतो आणि त्यामुळेच विना अडथळा तो पीक विमा शेतकर्‍यांना मिळावा हीच अपेक्षा.

- Advertisment -

ताज्या बातम्या