अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने 2025-26 च्या खरीप व रब्बी हंगामातील बाजरी व ज्वारी पिकाच्या कर्ज रक्कमेत दहा हजारांची वाढ केली आहे. बुधवारी झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत याबाबत निर्णय घेतला असल्याची माहिती चेअरमन शिवाजी कर्डिले यांनी दिली. बँकेच्यावतीने खरीप व रब्बी हंगामातील बाजरी व ज्वारी पिकासाठी एकरी 30 हजार रुपये कर्ज देण्यात येत होते. यात आता 10 हजारांची वाढ करून या पिकांना आता 40 हजार रुपये एकरी कर्ज देण्यात येणार आहे. तसेच बँकेमार्फत 26 मार्चअखेर अल्पमुदत पीककर्जापोटी 2 हजार 421 कोटींचे कर्ज वाटप केलेले आहे.
जिल्ह्यातील शेतकर्यांनी 31 मार्चअखेर असलेल्या वसुलास पात्र पीक कर्ज रकमेचा वेळेत भरणा करून शासनाच्या व्याज परतावा धोरणाचा फायदा घ्यावा. यामुळे त्यांना 3 लाखांपर्यंतच्या पीक कर्जास शून्य टक्के व्याजदराचा फायदा मिळणार आहे. जुने कर्ज परतफेड केल्यावर शेतकर्यांना तातडीने नवीन कर्ज पुरवठा होणार असून शेतकर्यांनी 31 मार्चपूर्वी थकबाकीचा भरणा करावा, असे आवाहन चेअरमन कर्डिले यांनी केले आहे. शेतकरी कर्जदार शेतकर्यांसाठी 29, 30 व 31 मार्च रोजी बँकेचे कामकाज सुरू राहणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.