Saturday, July 27, 2024
Homeनाशिकपावसाची हुलकावणी; पिके धोक्यात

पावसाची हुलकावणी; पिके धोक्यात

निफाड । प्रतिनिधी Niphad

शेतीमालाच्या कोसळत्या बाजारभावामुळे शेतकर्‍यांचे आर्थिक नियोजन कोलमडून पडत असतानाच आता गत अडीच महिन्यांपासून पावसाने देखील जिल्ह्याच्या कॅलिफोर्नियाकडे पाठ फिरवल्याने ( Lack of Rain ) शेतातील उभी पिके जळू लागली असून यावर्षी द्राक्षबागांची छाटणी करावी की नाही असा प्रश्न बळीराजाला सतावू लागला आहे.

- Advertisement -

सधन तालुका म्हणून निफाडची ओळख आहे. मात्र गत काही वर्षापासून नैसर्गिक आपत्ती, शेतीमालाचे कोसळते बाजारभाव, व्यापारी पलायन, विविध रोगांचा प्रादूर्भाव, वाढते वीजभारनियमन अन् वीजबिलात झालेली भरमसाठ वाढ यामुळे शेतकर्‍यांची कोंडी होतांना दिसत आहे. निफाड तालुक्याचा शेतकरी हा नेहमीच नगदी पिके घेण्याला प्राधान्य देत आला आहे. मात्र यावर्षी प्रारंभी पावसाने बर्‍यापैकी हजेरी लावली.

परिणामी तालुक्यातील शेतकर्‍यांनी मका, सोयाबीन, भुईमूंग, भाजीपाला, ऊस, टोमॅटो आदी पिकांची लागवड केली. अनेकांनी महागडे लाल कांदा बियाणे घेवून टाकले. मात्र आता गत दोन महिन्यांपासून पाऊस जो गायब झाला तो पुन्हा येण्याचे नाव घेत नसल्याने शेतकर्‍यांची चिंता वाढली आहे. तालुक्याच्या पश्चिम व उत्तर भागात टोमॅटोची लागवड मोठ्या प्रमाणात झाली आहे. मात्र टोमॅटो पिकावर करपा रोगाचा प्रादूर्भाव वाढत असतांनाच आता पाणीटंचाईचे संकट उभे ठाकले आहे. त्यामुळे हातात आलेले टोमॅटोचे पीक सोडून देण्याची वेळ शेतकर्‍यांवर आली आहे. या पिकासाठी शेतकर्‍यांनी मोठ्या प्रमाणात खर्च केला.

साहजिकच मेहनतीबरोबर खर्च देखील वाया जाण्याची शक्यता आहे. विहिरी कोरड्याठाक पडू लागल्या आहेत. टोमॅटो, मका, सोयाबीन, भाजीपाला पिके कशी वाचवावीत असा प्रश्न पडला आहे.तालुक्यातील सर्वाधिक क्षेत्रावर द्राक्षबागा उभ्या आहेत. पाणीटंचाई उग्र रूप धारण करीत असल्याने द्राक्षबागांचे भवितव्य अधांतरीच झाले आहे.

मागील वर्षी ऑगस्ट महिन्यात नदी, नाले दुथडी भरून वाहत होत्या. विहिरी तुडूंब भरल्या होत्या. यावर्षी मात्र याउलट स्थिती आहे. तालुक्याला वरदान ठरलेल्या गोदावरी नदीतून पाणी वाहत असले तरी ते पाणी जनावरे देखील पीत नाहीत. तालुक्याच्या उत्तर भागाला वरदान असलेल्या विनिता, करामाई, सपूर्णाई या नद्यांबरोबरच पूर्वेकडील शिवनदी, गोई खोरे कोरडेठाक आहे. बाणगंगा व पाराशरी नद्यांतूनदेखील यावर्षी पाणी वाहिले नाही. तालुक्यातून वाहणारे कालवे देखील कोरडेठाक पडले आहेत.

उभी पिके वाचवण्यासाठी कालव्यांना पाणी सोडून परिसरातील वळण बंधारे, पाझर तलाव कालव्याच्या पाण्याने भरून द्यावेत. महावितरणने सुरळीत वीजपुरवठा करून शेतकर्‍यांना माफक वीजबिले पाठवीत, अशी मागणी होत आहे.

वळण बंधारे भरून द्या

आज शेतकर्‍याची अशी वाईट अवस्था झाली आहे. कोणत्याच शेतीमालाला भाव नाही, अन् आता पाऊसदेखील नाही. महागडी खते, औषधे, बियाणे घेऊन व मजूर आणून पिके उभी केली पण आता पाऊसच रूसला. वर्षागणिक ऋतुचक्र बदलतांना दिसत आहे. पावसाळा सुरू होऊन अडीच महिने लोटले अजून पाऊस नाही अन् आता पीक काढणीच्या वेळेला आला, तर हातात येणारे पीकदेखील वाया जाईल. शासनाने तालुक्यातील सर्वच कालव्यांना पाणी सोडून वळण बंधारे, पाझर तलाव, नाले पाण्याने भरून द्यावेत.

लक्ष्मण निकम, शेतकरी, नांदुर्डी

- Advertisment -

ताज्या बातम्या