Saturday, July 27, 2024
Homeमुख्य बातम्यादेशदूत विशेष : नाशिक शहरातील पोलीस ठाण्यांमध्ये कोट्यवधींची वाहने धुळखात; तक्रारदारांसह पोलिसांना...

देशदूत विशेष : नाशिक शहरातील पोलीस ठाण्यांमध्ये कोट्यवधींची वाहने धुळखात; तक्रारदारांसह पोलिसांना अडचण, भ्रष्टाचाराचे आरोप

नाशिक | फारुक पठाण | Nashik

शहरातील जवळपास सर्व पोलीस ठाण्यांसह (Police Stations) वाहतूक शाखेच्या कार्यालयातील प्रांगणात कोट्यावधी रुपयांनी बेवारस व विविध गुन्ह्यांमध्ये जमा करण्यात आलेली वाहने धुळखात (Dusted) पडून आहे. त्यामुळे पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी येणार्‍या नागरिकांसह पोलीस अधिकारी व सेवकांना देखील मोठी अडचण निर्माण झाली आहे. वरिष्ठ अधिकार्‍यांनी याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी नागरीकांनी (Citizens) केली आहे…

- Advertisement -

एकीकडे लाखो रुपये खर्चून पोलीस ठाण्यांसह चौक्यांचे देखील आधुनिकरण होत आहे, तर दुसरीकडे विविध गुन्ह्यांमध्ये जमा करण्यात आलेल्या वाहनांमुळे नागरिकांची गैरसोय होत असल्याचा अजब प्रकार दिसत आहे. नाशिक शहरातील भद्रकाली पोलीस ठाणे, मुंबई नाका पोलीस ठाणे, सरकारवाडा पोलीस ठाणे, पंचवटी पोलीस ठाणे, इंदिरानगर पोलीस ठाणे, गंगापूर पोलीस ठाण्यांसह जवळपास सर्वच पोलीस ठाण्यांच्या आवारात मागील अनेक वर्षांपासून अशी शेकडो वाहने धुळखात पडून आहे. यामध्ये हजार दोन हजार किंमतीच्या दुचाकी पासून लाखो रुपये किंमतीच्या चारचाकी वाहनांचा समावेश आहे.

शासन पोलीस ठाणे तसेच पोलिसांचे आधुनिकरण करत आहे. त्यामुळे वाहतूक पोलीस आता पावती फाडतांना दिसत नसून थेट वाहतूक नियम मोडणार्‍या वाहन चालकांना ऑनलाइन दंड देत आहे. वाहतूक नियमाचे भंग होताच वाहन चालकांना त्वरीत फोटो काढण्यात येत आहे. त्यामुळे आधुनिक पद्धतीने यंत्र पोलिसांना देण्यात आले आहे. त्याच पद्धतीने विविध गुन्ह्यांचा तपास करणार्‍या पोलिसांना देखील आधुनिक यंत्र देण्यात आले आहे. तंत्रज्ञानाचा वापर करून पोलीस गुन्ह्याचा तपास करीत आहे. यामुळे तपास लवकर होत आहे. मात्र दुसरीकडे पोलीस ठाण्याच्या आवारात मागील अनेक वर्षांपासून विविध गुन्ह्यांमध्ये जमा करण्यात आलेल्या मुद्देमाला पैकी दुचाकी, चारचाकी वाहने पडून आहे, त्यासाठी काहीच नियोजन झाल्याचे दिसत नाही. यामुळे पोलीस ठाण्यातील मोठी जागा या उभ्या असलेल्या वाहनांच्या ताब्यात आहे. त्यामुळे त्या जागेचा उपयोग सामान्य नागरिक किंवा पोलिसांना देखील करता येत नाही.

मध्यंतरी मुंबई नाका पोलीस ठाणे आवारात विविध गुन्ह्यांमध्ये जमा करण्यात आलेल्या चारचाकी वाहनांनी पेट घेतल्यामुळे एकच खळबळ उडाली होती. आगीत दोन ते तीन चारचाकी वाहने जळून खाक झाली होती. पोलिसांनी विविध गुन्ह्यांमध्ये कारवाईसाठी वाहने जमा करून मुंबई नाका पोलीस ठाण्याच्या आवारात ठेवली होती, मात्र पोलीस ठाण्याच्या संरक्षण भिंतीच्या बाहेरच्या बाजूला कोणीतरी व्यक्ती झोपला होता व त्याने काहीतरी जाळल्यामुळे ही आग लागल्याचे सांगितले गेले होते. मात्र या घटनेनंतरही पोलीस प्रशासनाने कारवाई केली नाही. तर अद्याप अशी वाहने मुंबई नाका पोलीस ठाण्याच्या आत मध्ये तसेच बाहेरच्या रस्त्यावर देखील उभी आहे. तशीच परिस्थिती भद्रकाली पोलीस ठाणे आवारातील देखील आहे. त्यामुळे यावर वरीष्ठ पोलीस अधिकारी लक्ष देऊन कारवाई करतील का? व ही जागा मोकळी होणार का? असे प्रश्न नागरिक उपस्थित करीत आहे.

त्या’ प्रकरणाचे काय झाले?

शहरातील भद्रकाली पोलीस ठाण्याच्या आवारातील भंगार साहित्याची विल्हेवाट लावण्याच्या नावाखाली काही सुस्थितीतील मोटारसायकली देखील भंगार व्यावसायिकांना विकल्याचा आरोप काही पोलीस अधिकारी व सेवकांवर झाला आहे. याप्रकरणी थेट राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पुराव्यासह तक्रार करण्यात आली आहे. या संपूर्ण प्रकरणात सुमारे १५ लाखाहून अधिक रुपयांचा घोटाळा झाल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत लासूरे यांनी केला आहे. याबाबत त्यांनी पोलीस आयुक्तांसह मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस, गृह अप्पर सचिव, पोलीस महासंचालक यांच्याकडे तक्रार केल्या आहे.

कायद्यानुसार लिलाव

जवळपास प्रत्येक गुन्ह्यात आरोपी वाहनाचा वापर करतो. काही गुन्ह्यांमध्ये एकापेक्षा जास्त वाहनांचा समावेश असतो. पोलीस संशयीतासह वाहनाला देखील ताब्यात घेतात. तर जसजसे न्यायालयाचे निकाल येतात, त्या पध्दतीने जमा केलेली वाहने मालकाला परत करण्यात येतात. त्याचप्रमाणे बेवारस व इतर वाहनांचा कायद्यानुसार लिलाव देखील करण्यात येतो.

भद्रकाली पोलीस ठाण्यात झालेल्या प्रकाराची तक्रार मुख्यमंत्र्यांसह गृहमंत्री व इतरांकडे केली आहे. त्यानुसार पोलीस उपायुक्तांनी चौकशी करुन पोलीस आयुक्तांना त्याचा अहवाल दिल्याची माझ्याकडे माहिती आहे. मात्र हा प्रकार दाबण्यात आला असे समजते. यामध्ये एक वरिष्ठ अधिकारी असून त्यांची माहिती आरटीआय अंतर्गत मागितली आहे. माहिती मिळाल्यावर थेट न्यायालयात दाद मागणार आहे.

चंद्रकांत लासुरे, सामाजिक कार्यकर्ते, नाशिक

- Advertisment -

ताज्या बातम्या