देवगड फाटा (वार्ताहर) – नेवासा तालुक्यातील प्रवरासंगम परिसरातील सुमारे 25 कावळे अचानक मरण पावले असून आणखी 15 कावळे बाधित आहेत. कावळ्यांच्या मृत्यूमुळे पक्षीप्रेमींनी दुःख व्यक्त केले आहे. सरपंच सुनील बाकलीवाल व पक्षीप्रेमींनी .फोन करून पशुधन पर्यवेक्षक डॉक्टरांना बोलावले.
शवविच्छेदन करून नमुने पुणे येथील पशुरोग निदान प्रयोगशाळा येथे पाठवले जाणार आहेत. अहवाल आल्यानंतर मृत्यू चे कारण स्पष्ट होईल. बाधित कावळ्यावर उपचार करण्यात आले असे पशुधन अधिकार्यांनी सांगितले.
या कावळ्यांचा मृत्यू विषाणूजन्य रोगामुळे झाला की विषबाधामुळे हे निष्पन्न झाले नाही.
याबाबतचे सविस्तर वृत्त असे की, प्रवरासगम परिसरातील सुमारे 25 कावळे शुक्रवारी सकाळी मृत्यूमुखी पडलेले दिसून आले. काहींनी शंका व्यक्त केली की, विजेच्या शॉकमुळे यांचा मुत्यू झाला असावा. परंतु गावात इतर ठिकाणी ही कावळे मृत्यू झाल्याचे आढळले या घटनेची खबर तातडीने वन विभागाला व पशुवैद्यकीय अधिकारीना देण्यात आली. एवढ्या मोठ्या प्रमाणात कावळे मरण पावण्याची ही प्रथमच वेळ असल्याने काही पक्षी प्रेमींनी सांगितले
.पशुवैद्यकीय अधिकारी यांनी या ठिकाणी येऊन सर्व कावळ्यांची शव एकत्रितरित्या गोळा केले. या कावळ्यांचे शवविच्छेदन केले.
प्रवरा संगम परिसर हा नदीकाठी असल्याने व मोठ्या प्रमाणात वृक्ष असल्याने या ठिकाणी पक्ष्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे.