Monday, July 1, 2024
Homeनाशिकलोणावळा, खंडाळ्यात पर्यटकांची गर्दी

लोणावळा, खंडाळ्यात पर्यटकांची गर्दी

पुणे । प्रतिनिधी Pune

- Advertisement -

बकरी ईद शनिवार व रविवारच्या सुट्टय़ांना जोडून आल्याने या सलग सुट्टय़ांचा आनंद घेण्यासाठी लोणावळा, खंडाळा व पवनानगर परिसरामध्ये मोठय़ा प्रमाणात पर्यटक दाखल झाले आहेत. सर्वत्र पर्यटकांची गर्दी झाल्याने रस्त्यांवर वाहतूक कोंडी झाल्याचे चित्र पहायला मिळत आहे.

लोणावळय़ात अद्याप पावसाला सुरुवात झाली नसली, तरी पावसाळी पर्यटनाचा व येथील निसर्गाचा आनंद घेण्यासाठी पर्यटक गर्दी करू लागले आहेत. दोन दिवसांपूर्वी लोणावळा शहरात झालेल्या जोरदार पावसानंतर पाऊस पुन्हा गायब झाला आहे. त्यामुळे सध्या दिवसा कडक उन्हाचा त्रास सहन करावा लागत आहे. असे असले तरी सायंकाळच्या सत्रामध्ये आल्हाददायक गारवा अनुभवायला मिळत आहे. शाळांना शनिवारपासून सुरुवात झाली आहे. सुरुवात झाली असली, तरी दुपारनंतर व पुढील दोन दिवस सुट्टी असल्याने लोणावळय़ात पर्यटकांची गर्दी होण्यास सुरुवात झाली आहे.

शनिवारी सकाळच्या सत्रात काहीसे खुले असणारे रस्ते हे दुपारनंतर कोंडीत अडकत असल्याचे दिसत आहे. तीन दिवस सुट्टी असल्याने अनेक पर्यटक मुक्कामाचे नियोजन करून लोणावळय़ात आले आहेत. त्यामुळे लोणावळा व खंडाळा परिसरामधील बहुतांश सर्वच हॉटेल्स व खासगी बंगलो फार्म हाऊस हे फुल्ल झाले आहेत. पर्यटन स्थळांवरदेखील पर्यटकांची गर्दी वाढू लागली आहे. लोणावळा शहराप्रमाणेच पर्यटकांच्या पसंतीस उतरलेले पवना धरण व त्या परिसरामधील निसर्ग पाहण्यासाठी पर्यटकांनी पवना धरण परिसरातदेखील मोठी गर्दी केली आहे.

लोणावळा ग्रामीण पोलीस व लोणावळा शहर पोलीस यांच्या वतीने वाहतूक कोंडीवर नियंत्रण ठेवण्यासाठी लोणावळा शहरासह पवनानगर परिसर, कार्ला फाटा, मळवली, भाजी लेणी परिसरात पोलीस बंदोबस्त नियुक्त करण्यात आला होता. पुणे ग्रामीण मुख्यालयातूनदेखील काही प्रमाणात पोलीस बंदोबस्त नियुक्त करण्यात आला होता.

- Advertisment -

ताज्या बातम्या