पुणे | Pune
आपल्या खेळीने क्रिकेटचं मैदान गाजवणारा क्रिकेटर ऋतुराज गायकवाड कालच विवाह बंधनात अडकला. गेले दोन-तीन दिवस त्याच्या लग्न समारंभाच्या मेहंदी, हळद अशा विविध कार्यक्रमांचे फोटो व्हायरल होत होते.
तर काल त्याने उत्कर्षा पवारशी लग्नगाठ बांधली. त्याच्या लग्नाचे फोटो समोर येताच सर्वांनी त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला. ऋतुराज आणि उत्कर्षा यांचा विवाहसोहळा महाबळेश्वर येथील आलिशान ‘ले मेरिडियन रिसॉर्ट अँड स्पा’मध्ये पार पडला. ऋतुराजने लग्नाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
उत्कर्षा स्वत: एक क्रिकेटर आहे आणि ती महाराष्ट्र महिला क्रिकेट संघासाठी खेळलेली आहे. उत्कर्षा महाराष्ट्र अंडर-१९ संघासाठी २०१२-१३ आणि २०१७-१८ मध्ये खेळली होती. महाराष्ट्राच्या सीनियर टीममध्ये तिची निवड झाली होती. उत्कर्षाने अष्टपैलू खेळाडू म्हणून मैदान गाजवलं आहे. १८ महिन्यांपूर्वी उत्कर्षाने शेवटचं क्रिकेट खेळलं होतं. सध्या ती आरोग्य विज्ञान संस्थे (INFS) मध्ये शिक्षण घेत आहे.
जागतिक कसोटी चॅम्पियनशिप फायनलसाठी भारताच्या राखीव संघात ऋतुराजचा समावेश करण्यात आला होता. मात्र लग्न असल्यामुळे त्याने नाव मागे घेतले होते. गायकवाड यांच्या लग्नाला त्याचे चेन्नईच्या संघातील सहकारी खेळाडू शिवम दुबे आणि प्रशांत सोलंकी यांनीही हजेरी लावली होती.