Sunday, June 14, 2026
Homeक्रीडाIPL 2026 : चेन्नईच्या होम ग्राऊंडवर पंजाब किंग्जचे आव्हान; कोण मारणार बाजी?

IPL 2026 : चेन्नईच्या होम ग्राऊंडवर पंजाब किंग्जचे आव्हान; कोण मारणार बाजी?

चेन्नई । Chennai

इंडियन प्रीमियर लीग (IPL) २०२६ चा थरार आता रंगात आला असून, आज संध्याकाळी क्रिकेट चाहत्यांना एक हाय-व्होल्टेज सामना पाहायला मिळणार आहे. चेन्नईच्या ऐतिहासिक एम.ए. चिदंबरम स्टेडियमवर यजमान चेन्नई सुपर किंग्ज (CSK) आणि पंजाब किंग्ज (PBKS) हे दोन बलाढ्य संघ आमनेसामने ठाकणार आहेत. संध्याकाळी ७.३० वाजता सुरू होणाऱ्या या सामन्यात सर्वांच्या नजरा प्रामुख्याने महान क्रिकेटपटू एम. एस. धोनीवर खिळल्या आहेत. धोनी आजच्या सामन्यात मैदानावर उतरणार की नाही, याबाबत चाहत्यांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे.

- Advertisement -

चेन्नई सुपर किंग्जसाठी आजचा सामना अत्यंत महत्त्वाचा आहे. पाच वेळा आयपीएल विजेतेपद पटकावणाऱ्या चेन्नईला त्यांच्या पहिल्या सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यामुळे आज आपल्या घरच्या मैदानावर विजयाचे खाते उघडण्यासाठी ऋतुराज गायकवाडचा संघ जीवाचे रान करेल. दुसरीकडे, पंजाब किंग्जचा संघ आपला विजयाचा धडाका कायम राखण्याच्या निर्धाराने मैदानात उतरेल. पंजाबने आतापर्यंत एकदाही जेतेपद मिळवले नसले तरी, मागील हंगामात त्यांनी अंतिम फेरीपर्यंत मजल मारली होती, ज्यामुळे त्यांचा आत्मविश्वास उंचावलेला आहे.

दोन्ही संघांच्या ‘हेड टू हेड’ आकडेवारीवर नजर टाकली तर चुरस दिसून येते. आतापर्यंत चेन्नई आणि पंजाब यांच्यात एकूण ३२ सामने खेळले गेले असून, दोन्ही संघांनी प्रत्येकी १६-१६ सामने जिंकले आहेत. आकड्यांच्या बाबतीत जरी दोन्ही संघ बरोबरीत असले, तरी चेन्नईच्या मैदानावर यजमानांचे पारडे जड मानले जाते. आरसीबीने १८ वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर विजेतेपद मिळवल्याने, आता पंजाब किंग्जवरही जेतेपदाचा दुष्काळ संपवण्यासाठी दबाव आणि प्रेरणा दोन्ही असणार आहे.

चेन्नईतील एम. ए. चिदंबरम स्टेडियमची खेळपट्टी फलंदाजांसाठी नंदनवन मानली जाते. या खेळपट्टीवर वेगवान गोलंदाजांना फारशी मदत मिळत नाही, मात्र फिरकीपटू (Spinners) सामन्याच्या मधल्या षटकांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावू शकतात. ऐतिहासिक आकडेवारीनुसार, या मैदानावर झालेल्या ९१ सामन्यांपैकी पहिल्यांदा फलंदाजी करणाऱ्या संघाने ५१ वेळा, तर धावांचा पाठलाग करणाऱ्या संघाने ४० वेळा विजय मिळवला आहे. त्यामुळे नाणेफेक जिंकणारा संघ प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेण्याची शक्यता अधिक आहे.

आजच्या सामन्यासाठी दोन्ही संघांची संभाव्य प्लेइंग इलेव्हन संतुलित दिसत आहे. चेन्नईच्या संघात कर्णधार ऋतुराज गायकवाडसह शिवम दुबे, सरफराज खान आणि अनुभवी खेळाडूंचा भरणा आहे. तर पंजाब किंग्जची धुरा श्रेयस अय्यरकडे असून, त्यांच्याकडे मार्कस स्टॉइनिस आणि युझवेंद्र चहलसारखे मॅचविनर खेळाडू आहेत. एका बाजूला चेन्नईचा ‘होम ॲडव्हांटेज’ आणि दुसरीकडे पंजाबची जिद्द, यामुळे आजचा सामना क्रिकेट प्रेमींसाठी मोठी मेजवानी ठरणार आहे.

ताज्या बातम्या

Nashik Vidhan Parishad Election : महायुतीची ‘सेफ हाऊस’ पॉलिटिक्स; शिवसेनेनंतर भाजपचेही...

0
नाशिक | Nashik स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधानपरिषद निवडणुकीच्या (Nashik Vidhan Parishad Election) पार्श्वभूमीवर महायुतीने (Mahayuti) आपल्या नगरसेवकांना एकत्र ठेवण्याची रणनीती आखली आहे. शिवसेनेचे (शिंदे...