जळगाव – Jalgaon
संभाव्य महानगरपालिका निवडणुका आणि येणारे सण लक्षात घेता जिल्ह्यातील सामाजिक आणि राजकीय वातावरण तापू शकते हे लक्षात घेवून, कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आले आहेत. जिल्हाधिकारी यांचे आदेशान्वये अपर जिल्हादंडाधिकारी गजेंद्र पाटोळे यांनी मुंबई पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३७(१) व (३) अंतर्गत हा आदेश जारी केला आहे.
दि.३ मे २०२५ रोजी पहाटे ००.०१ वाजल्यापासून ते दि.१६ मे २०२५ रोजी रात्री १२.०० वाजेपर्यंत संपूर्ण जळगाव जिल्हा हद्दीत जमावबंदी लागू राहील. या कालावधीत पाच किंवा अधिक लोकांनी जमणे, सभा, मिरवणूक घेणे, शस्त्र बाळगणे, दाहक किंवा स्फोटक पदार्थ बरोबर ठेवणे, चित्रांचे दहन, अशांतता पसरविणारे वर्तन किंवा साहित्य तयार करणे, प्रसारित करणे यावर बंदी घालण्यात आली आहे.
जिल्ह्यातील अलीकडील घटनांमुळे जातीय सलोखा बिघडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तसेच, ८ मे ते १६ मे दरम्यान विविध सण, जयंती, सांस्कृतिक व धार्मिक कार्यक्रमांना मोठ्या प्रमाणावर जनसमुदाय एकत्र येणार असल्याने प्रतिबंधात्मक उपाययोजना आवश्यक असल्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे.
या आदेशांतर्गत वयोवृद्ध, अपंग व वैद्यकीय कारणास्तव लाठी किंवा तत्सम सहाय्यक साधनांचा वापर करणाऱ्या नागरिकांना सूट देण्यात आली आहे. तसेच शासकीय कार्यक्रम, धार्मिक मिरवणुका, प्रेतयात्रा व विवाह मिरवणुकांवर हा आदेश लागू होणार नाही. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिस अधीक्षकांची पूर्वपरवानगी आवश्यक राहील.