मुंबई | Mumbai
अरबी समुद्रात तयार झालेले ‘शक्ती’ चक्रीवादळ आता तीव्र झाले असून त्याचे रूपांतर ‘तीव्र वादळा’मध्ये झाल्यामुळे राज्यात ४ ते ७ ऑक्टोबर दरम्यान पालघर जिल्ह्यासह मुंबई, ठाणे, रायगड, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. राज्यात सप्टेंबर महिन्यात मुसळधार पावसाने थैमान घातले होते, ते संपत नाही तर आता शक्ती चक्रिवादळाचे संकट उभे राहिले आहे. पुढील काही तासांत हे चक्रिवादळ आणखी तीव्र स्वरुप घेण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. कोकण किनारपट्टी, मुंबई, रायगड, ठाणे, सिंधुदूर्ग जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार शक्ती चक्रीवादळामुळे 4 ते 5 ऑक्टोबर दरम्यान समुद्रात ताशी 40 ते 60 किलोमीटर वेगाने वादळी वारे वाहण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रातील विदर्भ आणि मराठवाड्याच्या काही भागांसह या भागातही मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला होता. शनिवारी दुपारी १२ वाजताच्या सुमारास हे चक्रीवादळ वायव्य आणि ईशान्य अरबी समुद्रावर केंद्रित होते. ते द्वारकेपासून सुमारे ४२० किमी अंतरावर होते. आता ते ओमानच्या मासिराह किनाऱ्याकडे सरकत असल्याचे समोर आले आहे.
वादळाच्या पार्श्वभूमीवर समुद्रकिनाऱ्यांवर फिरण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांनीही अधिक खबरदारी बाळगावी, असे प्रशासनाचे आवाहन आहे. समुद्राच्या पाण्यात उतरणे, किनाऱ्याजवळ फिरणे किंवा जलक्रीडा प्रकारांपासून दूर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. हवामानातील बदलामुळे समुद्रात उंच लाटा उसळण्याची शक्यता असल्याने किनारपट्टीजवळील नागरिकांचे स्थलांतरही सुरू करण्यात आले आहे.
तसेच, मच्छीमारांनी पुढील काही दिवस समुद्रात मासेमारीसाठी जाऊ नये असे आवाहन करण्यात आले आहे. या दरम्यान वादळी वारे आणि उंच लाटा उसळण्याची शक्यता असल्याने समुद्र अत्यंत खवळलेला राहील, असा अंदाज असून तशा सूचना हवामान विभागाने मच्छीमार, मच्छीमार सहकारी संस्था आणि नौका मालकांना दिल्या आहेत. तर सागरी सुरक्षितता आणि जीवितहानी टाळण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सतर्क ठेवण्यात आली आहे.
4 ते 7 ऑक्टोबर या कालावधीमध्ये वायव्य अरबी समुद्र, त्याला लागून असलेला ईशान्य अरबी समुद्राचा भाग, मध्य अरबी समुद्र आणि गुजरात-उत्तर महाराष्ट्र किनारपट्टी तसेच समुद्रात जाऊ नये, असे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा




