Monday, January 26, 2026
Homeदेश विदेशगोव्यात नाईट क्लबमध्ये सिलेंडरचा स्फोट; २५ जणांचा होरपळून अन् गुदमरल्याने मृत्यू

गोव्यात नाईट क्लबमध्ये सिलेंडरचा स्फोट; २५ जणांचा होरपळून अन् गुदमरल्याने मृत्यू

गोवा | Goa
उत्तर गोव्यामध्ये नाईटक्लबमध्ये गॅस सिलिंडरचा स्फोट झाल्याने आगीचा भडका उडाला. अर्पोरा परिसरात झालेल्या दुर्घटनेत २५ जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये नाईटक्लबचे कर्मचारी, विदेशी पर्यटकांचा समावेश आहे. अशी माहिती गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी दिली आहे.

उत्तर गोव्यात बर्च बाय रोमियो लेन या नाइटक्लबमधील डान्स फ्लोअरवर किमान १०० लोक होते, तेव्हा तिथे आग लागली. आग लागल्यानंतर तळघरातील किचन, पायऱ्यांवर अनेक लोक फसले गेले. काही जणांचा आगीने होरपळून तर अनेकांचा धुरात घुसमटून मृत्यू झाला.

- Advertisement -

प्राथमिक माहितीनुसार, गॅस सिलिंडरच्या स्फोटामुळे आगीचा भडका उडाला. काही मिनिटांतच संपूर्ण इमारतीला आग लागली. जीव वाचवण्यासाठी लोक बेसमेंटमध्ये पळाले. पण तिथेच होरपळून अन् गुदमरून लोकांचा मृत्यू झाला. आगीनंतर परिसरात मोठ्या प्रमाणावर धुराचे साम्राज्य पसरल्याने अनेकांना बाहेर पडणे शक्य झाले नाही, ज्यामुळे गुदमरून मृत्यू झालेल्यांची संख्या जास्त आहे. २५ जणांमध्ये ४ पर्यटक, १४ कर्मचारी होते आणि ७ जणांची ओळख अद्याप पटलेली नाही. सहा जण जखमी झाले आहेत आणि त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

YouTube video player

प्राथमिक तपासात गॅस सिलिंडरच्या स्फोटामुळे आग लागल्याचे दिसून येत असल्याचे गोव्याचे डीजीपी आलोक कुमार यांनी सांगितले. ते म्हणाले की, शनिवारी रात्री १२:०४ वाजता ही घडली. पोलिस, अग्निशमन दल आणि रुग्णवाहिका तात्काळ घटनास्थळी दाखल झाल्या. आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले आहे. या दुर्घटनेचा तपास करण्यात येत आहे.

प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की, आग क्लबच्या पहिल्या मजल्यावर लागली. जिथे पर्यटक नाचत होते. गोव्याची राजधानी पणजीपासून सुमारे २५ किमी अंतरावर असलेल्या अर्पोरा गावात असलेला बर्च बाय रोमियो लेन हा क्लब प्रसिद्ध आहे.

फायर अँड सेफ्टी ऑडिट होणार
गोव्यातील या दुर्घटनेनंतर स्थानिक आमदार माइकल लोबो यांनी याप्रकारे पुन्हा दुर्घटना घडू नये म्हणून फायर सेफ्टी ऑडिटची मागणी केली आहे. राज्यातील सर्व क्लबचे सेफ्टी ऑडिट करा असे त्यांनी म्हटले आहे. या मृतांमध्ये काही पर्यटक होते, परंतु बहुतांश लोक स्थानिक होते जे या क्लबमध्ये बेसमेंटमध्ये काम करत होते असेही आमदारांनी सांगितले.

मुख्यमंत्री सांवत काय म्हणाले?
मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले की, प्राथमिक तपासात नाईट क्लबने अग्निसुरक्षा नियमांचे पालन केले नसल्याचे दिसून आले आहे. मुख्यमंत्री सावंत म्हणाले, “हा दुर्दैवी प्रसंग आहे आणि गोव्यासारख्या पर्यटनस्थळासाठी हे योग्य नाही. या घटनेची सखोल चौकशी केली जाईल आणि दोषी आढळलेल्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल. क्लब व्यवस्थापन तसेच नियमांचे उल्लंघन करून क्लबला चालवण्याची परवानगी देणाऱ्या अधिकाऱ्यांवरही कारवाई केली जाईल.”

राष्ट्रपती, पंतप्रधानांनकडून शोक व्यक्त
उत्तर गोव्यातील आरपोरा येथील नाईट क्लबला लागलेल्या भीषण आगीच्या दुर्घटनेबद्दल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे की, “उत्तर गोवा जिल्ह्यातील आगीच्या दुःखद घटनेमुळे मौल्यवान जीव गमवावे लागल्याने मी अत्यंत व्यथित आहे. शोकाकुल कुटुंबांप्रति माझ्या मनःपूर्वक संवेदना आहेत. या कठीण काळात त्यांना बळ मिळो. जखमी झालेल्या व्यक्ती लवकरात लवकर बऱ्या व्हाव्यात, यासाठी मी प्रार्थना करते.”

तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही या घटनेबद्दल शोक व्यक्त केला आहे. त्यांनी ट्वीट करून सांगितले की, “गोव्यातील आरपोरा येथे झालेली आगीची दुर्घटना अत्यंत दुःखद आहे. ज्यांनी आपले प्रियजन गमावले आहेत, त्यांच्यासोबत माझ्या भावना आहेत. जखमी लवकर बरे व्हावेत अशी माझी कामना आहे.” पंतप्रधान मोदी यांनी दुर्घटनेनंतर तातडीने गोवा राज्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याशी फोनवरून चर्चा केली. पंतप्रधानांनी सांगितले की, “परिस्थितीबद्दल मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याशी बोललो. राज्य सरकार बाधित लोकांना सर्वतोपरी मदत करत आहे.”

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

ताज्या बातम्या

प्रकाश

मंत्री गिरीश महाजनांवर ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करा; माधवी जाधव यांना प्रकाश...

0
नाशिक | Nashikमंत्री गिरीश महाजन यांनी नाशिकमध्ये प्रजाकसत्ताक दिनाच्या दिवशी केलेल्या भाषणामुळे वादाला तोंड फुटले आहे. मंत्री महाजन यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव...