अंबासन । वार्ताहर Ambasan
बागलाण तालुक्यातील मोराणे सांडस येथील गावालगत असलेल्या पवार वस्तीत दुपारच्या वेळेस गॅस सिलिंडरच्या स्फोटामुळे लागलेल्या भीषण आगीत दहा पेक्षा अधिक घरांचे मोठे नुकसान झाले आहे. या दुर्घटनेत अनेक कुटुंबांचे संसारोपयोगी साहित्य पूर्णतः जळून खाक झाले असून, घराशेजारी बांधलेल्या सात ते आठ शेळ्या होरपळून मृत्युमुखी पडल्या आहेत.
पवार वस्तीतील बहुतांश कष्टकरी आदिवासी बांधव शेतीकामासाठी बाहेर गेले होते. दुपारी अचानक एक घर पेटल्याचे लक्षात आल्यानंतर गावात एकच खळबळ उडाली. घरांमध्ये लहान दोन बालके झोपलेली होती आणि घराजवळ काही पशुधनही बांधलेले होते. या संकटसमयी शेजारील तरुणांनी मोठे धाडस दाखवत दोघा लहानग्यांना आणि काही जनावरांना सुरक्षित बाहेर काढले. दरम्यान घरातील गॅस सिलेंडरचा स्फोट झाल्यामुळे आगीने रौद्र रूप धारण केले आणि आजूबाजूची घरे आगीत जळू लागली. लगेचच स्थानिकांनी सटाणा येथील अग्निशमन दलाला पाचारण केले. काही वेळातच अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी दाखल झाले आणि आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश मिळाले.
र्या आगीत अनेक कुटुंबांचे घर, कपडे, अन्नधान्य साठा, शैक्षणिक साहित्य आणि इतर जीवनावश्यक वस्तू जळून खाक झाल्या आहेत. घटनेची माहिती मिळताच बागलाणचे आमदार दिलीप बोरसे यांनी तातडीने घटनास्थळी भेट दिली आणि स्थानिकांशी संवाद साधत प्रशासनाला त्वरित मदत कार्य सुरू करण्याच्या सूचना दिल्या. तलाठी पिनू सोनवणे यांनी घटनास्थळी पंचनामा करून वरिष्ठ अधिकार्यांकडे तातडीचा अहवाल सादर करण्याचे आश्वासन दिले.
या आगीमुळे राजाराम पवन पवार, शुभम मल्हारी सोनवणे, रवींद्र सुरेश अहिरे, संदीप दीपक पवार, अनिल केदु गोधडे, किरण देवाजी माळी, पवन भिवसन माळी, भास्कर पवन अहिरे, मन्साराम पवन अहिरे व साहेबराव मल्हारी सोनवणे या आदिवासी कुटुंबाचे लाखो रूपयाचे नुकसान झाले आहे शासनाने आपदग्रस्तांना त्वरित मदत करावी अशी मागणी ग्रामस्थांतर्फे करण्यात आली आहे.