सुपरस्टार रजनीकांत यांना सोमवारी ५१ वा दादासाहेब फाळके पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. ही माहिती सर्वप्रथम भारतीय जनता पक्षाचे खासदार प्रकाश जावडेकर यांनी एप्रिलमध्ये दिली होती.
भारतीय सिनेसृष्टीतील हा सर्वात प्रतिष्ठित असा पुरस्कार मानला जातो. आपल्या सिनेसृष्टीत आजवर शेकडो महान कलाकार होऊन गेले आहेत. परंतु त्यापैकी मोजक्याच कलाकारांना दादासाहेब फाळके पुरस्कारानं गौरवण्यात आलं. यावरुनच या पुरस्काराचं महत्व आपल्या लक्षात येतं. परंतु प्रश्न असा की हा पुरस्कार कोणाला देतात? याची निवड कोण करतं? आणि पुरस्कार पटकावणाऱ्या व्यक्तीला काय बक्षिस मिळतं?
दादासाहेब फाळके पुरस्कार हा भारत सरकारतर्फे दरवर्षी भारतीय सिनेमामध्ये असामान्य कामगिरी करणार्या कलावंत व तंत्रज्ञांना दिला जाणारा सर्वोच्च पुरस्कार आहे. इ.स. १९६९ मध्ये दादासाहेब फाळके ह्यांच्या जन्मशताब्दीवर्षापासून हा पुरस्कार दिला जात आहे. हा पुरस्कार भारत सरकारच्या माहिती व नभोवाणी खात्यातर्फे दिला जातो.
दरवर्षी भरवल्या जाणाऱ्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळयादरम्यान ह्या पुरस्काराचे वाटप केले जाते. दादासाहेब फाळके या सरकारी पुरस्काराव्यतिरिक्त याच नावाचा पुरस्कार इतर संस्थांद्वारेही देण्यात येतो. १९६९ पासून दिल्या जात असणाऱ्या ह्या पुरस्काराची रक्कम अनेक वेळा बदलण्यात आली आहे.
१९६९ ते ७२ या काळात ढाल, शाल आणि रोख रुपये ११ हजार बक्षिस म्हणून दिलं जात होतं. पुढे १९७३ ते ७६ या कालावधीत सुवर्णपदक, शाल आणि रोख रुपये २० हजार बक्षिस म्हणून दिलं जात होतं. १९७७ ते ८३ या काळात बक्षिसाची रक्कम वाढवून ४० हजार रुपये करण्यात आली. पुढे सुवर्णपदक रद्द करुन त्याजागी सुवर्णकमळ दिलं जाऊ लागलं.
अन् आता २००६ पासून शाल, सुवर्णकमळ आणि रोख रुपये १० लाख बक्षिस म्हणून दिलं जात आहे. बक्षिसाच्या रकमेपेक्षा पुरस्कार पटकावणाऱ्या कलाकाराला मिळणारी प्रतिष्ठा खूप मोठी असते. पाश्चात्य सिनेसृष्टीत ऑस्करचं जे स्थान आहे तेच स्थान भारतीय सिनेसृष्टीत दादासाहेब फाळके पुरस्काराचं आहे.