आश्वी |वार्ताहर| Ashwi
आश्वी पोलीस ठाण्याच्या हद्दीत चोरीच्या (Theft) सत्राने नागरिक भयभीत झाले असून, बुधवारी (दि.29) दाढ खुर्द शिवारात चोरट्यांनी चक्क भरदिवसा घरात घुसून एका अल्पवयीन मुलाला धाक दाखवत रोख रक्कम आणि सोन्याचे दागिने (Gold Jewelry) लंपास केले आहेत. त्यामुळे पंचक्रोशीत खळबळ उडाली आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, दाढ खुर्द (Dadh Khurd) शिवारातील हरणदरा परिसरात धोंडीबा जोशी यांची वस्ती आहे. बुधवारी जोशी कुटुंबातील सदस्य कामानिमित्त घराबाहेर गेले होते. दुपारी 1 वाजेच्या सुमारास, जेव्हा घरात फक्त एक अल्पवयीन मुलगा होता, तेव्हा घराच्या मागील बाजूने चार अज्ञात चोरट्यांनी घरात प्रवेश केला. घरात अनोळखी व्यक्तींना पाहून मुलाने त्यांना हटकण्याचा प्रयत्न केला. मात्र, एका चोरट्याने मुलाला धाक दाखवत दाबून धरले. मुलाने प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला परंत त्याचा नाइलाज झाला. त्याचवेळी इतर तीन चोरट्यांनी घरातील सामानाची उचकापाचक सुरू केली. या लुटीत चोरट्यांनी घरातील सुमारे दीड ते दोन लाखांची रोख रक्कम आणि तीन ते साडेतीन तोळे सोन्याचे मौल्यवान दागिने (Gold Jewelry) असा मोठा ऐवज चोरून नेल्याचा अंदाज वर्तवला आहे.
या घटनेची माहिती मिळताच सहायक पोलीस निरीक्षक सुदाम शिरसाट यांनी तत्काळ हवालदार एम. एस. आहेर आणि सहकार्यांना घटनास्थळी पाठवले. माहिती मिळताच सरपंच सतीश जोशी यांनी देखील घटनास्थळी धाव घेतली. रात्री उशिरा याप्रकरणी तक्रार दाखल होण्याची शक्यता असून, पोलिसांकडून पंचनामा केल्यानंतरच चोरीला गेलेल्या एकूण मुद्देमालाची नेमकी किंमत स्पष्ट होणार आहे. दरम्यान, काही दिवसांपासून आश्वी पंचक्रोशीतील गावांमध्ये चोरीच्या घटनांचे प्रमाण वाढले आहे. मात्र, आता चोरट्यांनी थेट दिवसाढवळ्या वस्त्यांवर येऊन लुटमार सुरू केल्याने ग्रामस्थांमध्ये मोठी दहशत निर्माण झाली आहे. पोलिसांनी (Police) या चोरट्यांचा तत्काळ बंदोबस्त करावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.




