नाशिक | प्रतिनिधी
मूळ नेपाळचा रहिवासी असलेल्या २१ वर्षीय गुराख्याचा लाकडी दांडक्याने मारहाण करून खून करण्यात आल्याचा प्रकार सोमवारी (दि. २८) मध्यरात्री दहीपूल भागात घडला होता. यातील संशयितास गुन्हे शाखा युनीट एकच्या पथकाने शिताफीने अटक केली आहे…
हा संशयित गंगेवरील फिरस्ता बेगर असल्याचे स्पष्ट झाले असून त्याचा मुलीच्या छेडखानीतून हा खून झाल्याचे समोर आले आहे.
पिनेश उर्फ पिन्या रमेश खरे (२७, रा. गंगाघाट, मुळ सामोडे, ता. साक्री, धुळे) असे अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. हिला हिरालाल प्रजापती (२१, रा. माडसांगवी, मुळ रा. नेपाळ) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.
दोन ते तीन अज्ञात हल्लेखोरांनी प्रजापती यास लाकडी दांंड्यानी जबर मारहाण करून गंभीर जखमी केले यामध्ये त्यांचा मृत्यू झाला होता. घटनेची माहिती मिळाल्यानंतर भद्रकाली पोलीसांनी घटनास्थळी धाव घेऊन रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या प्रजापती यांना तातडीने जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले होते.
दरम्यान, प्रजापती यांच्या खुनाच्या घटनेनंतर शहर पोलीसांनी हल्लेखोरांचा शोध सुरू केला होता. अद्यापर्यंत त्यामागील नेमके कारण स्पष्ट होऊ शकले नव्हते.
याप्रकरणाचा समांतर तपास गुन्हे शाखा युनीट १ चे पथक करत होते. सराफ बाजारातील सीसीटिव्ही फुटेजच्या आधारे मोठ्या कौशल्याने संशयिताची ओळख पटविण्यात आली होती.
पथकाने त्यास गंगाघाटावरील दुतोंड्या मारूतीजवळून ताब्यात घेतले. यानंतर त्याने खूनाची कबुली दिली असून प्रजापती याने त्याच्या मुलीची छेडखाणी केल्याने त्यास मारहाण केल्याचे पोलीसांना सांगीतले आहे.
गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील, सहायक आयुक्त समीर शेख, वरिष्ठ पोलीस निरिक्षक आनंदा वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली अजय शिंदे, सहायक निरिक्षक सचिन खैरणार, महेश कुलकर्णी, रघुनाथ शेगर, दिनेश खैरणार, बलराम पालकर, पोपट कारवाळ, विजय गवांदे यांच्या पथकाने ही कामगिरी पार पाडली.