Tuesday, April 15, 2025
Homeसंपादकीयसंपादकीय : १४ एप्रिल २०२५ - गडकिल्ल्यांच्या संवर्धनावर भर हवा

संपादकीय : १४ एप्रिल २०२५ – गडकिल्ल्यांच्या संवर्धनावर भर हवा

छत्रपती शिवाजी महाराजांच्या गडकिल्ल्यांसह अन्य सांस्कृतिक स्थळांचे दर्शन घडवणारी दहा दिवसांची ऐतिहासिक सहल रेल्वेतर्फे आयोजित केली जाणार असल्याची घोषणा राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी नुकतीच केली. या उपक्रमामुळे वारसा लोकांसह आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचण्यास मदत होईल अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. अशी सहल सुरू झाल्यावर लोक तिचे स्वागत करतील.

दगडांच्या देशा..असे या वारशाचे वर्णन कवी गोविंदाग्रज करतात. हा वारसा लोकांना माहीत व्हावा म्हणून या ना त्या निमित्ताने अनेक यात्रा आयोजित केल्या जातात. अनेकांची गडकिल्ल्यांना भेट देण्याची इच्छा असते. तथापि त्या त्या ठिकाणी वाहतुकीच्या सुविधा उपलब्ध असतीलच असे नसते. युवा पिढी या सगळ्या समस्यांवर मात करताना आढळतात. मात्र सर्वांना ते शक्य नसेल. गडकिल्ल्यांपर्यंत सहजरित्या पोहोचवणारी सुविधा उपलब्ध झाली तर हा वारसा जाणून घेण्याची अनेकांची इच्छा पूर्ण होऊ शकेल. तथापि काळाच्या मार्‍यात अनेक किल्ल्यांची पडझड झालेली आढळते. अनेक किल्ल्यांवर फक्त अवशेष शिल्लक आढळतात. या सहलीच्या निमित्ताने गडकिल्ल्यांच्या संवर्धनाची संधी साधता येऊ शकेल.

- Advertisement -

कोणतेही पर्यटन तात्पुरते आणि कायमस्वरूपी रोजगार निर्माण करणारे ठरते. त्याला उपरोक्त पर्यटन देखील अपवाद नाही. गडकिल्ले परिसरात कोणकोणत्या प्रकारचे रोजगार उपलब्ध होऊ शकतात याचा अंदाज घेऊन त्याचा एक आकृतिबंध तयार केला जाऊ शकेल. अन्यथा सध्या केवळ गडकिल्लेच नव्हे तर अन्यत्रही लोकांनी दाटीवाटीने टाकलेल्या टपर्‍या आणि दुकानांची गजबज दिसते. यातून पर्यटकांची सोय होते हे खरे, पण त्याचा अर्थ कोणीही उठावे आणि कुठेही टपरी टाकावी असा होऊ शकेल का? नियोजनबद्ध रोजगार निर्मिती ती उणीव दूर करणारी ठरू शकेल. गडाचा परिसर आणि त्यानुसार तिथे रोजगार निर्मितीची क्षमता लक्षात घेतली गेली त्यात किती जणांना सामावून घेतले जाऊ शकेल याचाही अंदाज येऊ शकेल. पर्यटक कमी आणि दुकानेच जास्त असे होऊ नये इतकेच.

सगळ्याच गडकिल्ल्यांचा इतिहास कोणाच्याही अंगावर काटा आणणाराच आहे. त्यांना राखण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी पराक्रमाची शर्थ केली आहे. हजारो मावळ्यांनी त्यांचे रक्त सांडले आहे. कल्पनेपलीकडचा पराक्रम गाजवला आहे. अशा ठिकाणांना भेटी देताना पर्यटकांनी देखील त्याचे भान राखावे. सध्या ते तसे किती ठिकाणी राखलेले आढळते? याउलट दगडांवर स्वतःची नावे कोरणे, कचरा करणे, पाण्याच्या टाक्यांमध्ये प्लॅस्टिकच्या बाटल्या टाकणे असे प्रकार घडतात. एरवी आणि सहलीदरम्यान तसे होऊ नये हे मात्र नक्की.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भेटीला

0
मुंबई । आज रात्री उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भेटीला शिवतीर्थ निवासस्थानी स्नेहभोजनासाठी गेले आहेत. या वेळी अमित ठाकरे, मंत्री उदय सामंत...