प्लास्टिक आणि थर्माकोल प्रदूषणाचे ओझे वसुंधरेला पेलवेनासे होत आहे. तिचा श्वास गुदमरत आहे. कारण तो श्वासही आता प्लास्टिक व्यापत आहे. मातीत, पाण्यात, प्राण्यांच्या पोटात, हवेत आणि आता माणसांच्या अन्नातही प्लास्टिकचे अंश आढळत आहेत. मायक्रो प्लास्टिक म्हणजे प्लास्टिकचे सूक्ष्म कण ही नवीनच गंभीर समस्या!
जे कण माणसाच्या रक्तात आढळले आहेत. यावर जगभरात संशोधन सुरु आहे. ‘डच नॅशनल ऑर्गनायझेशन फॉर हेल्थ रिसर्च अँड डेव्हलपमेंट’ संस्थेने याचा अभ्यास केला. त्यांनी पाहणी केलेल्या सुमारे 80 टक्के माणसांच्या रक्तात मायक्रो प्लास्टिक आढळले, असे वृत्त माध्यमात प्रसिद्ध झाले आहे. एकूणच प्लास्टिकने माणसाचे आयुष्य व्यापले आहे. प्लास्टिकचा अतिरेकी वापर टाळावा, असे आवाहन सरकार, विविध संस्था वारंवार करतात. त्या वापराला पर्याय शोधण्याचे आवाहन करतात. नाशिकच्या दिंडोरी येथील श्री स्वामी समर्थ केंद्राने यासाठी स्वयंस्फूर्त पुढाकार घेतला आहे.
केंद्राने स्टीलच्या ताटांची बँक सुरु केली आहे. घरगुती किंवा छोटेखानी कार्यक्रमांसाठी सुरुवातीच्या टप्प्यात 50 ताटांचा सेट मोफत वापरायला दिला जाणार आहे. नाशिक, दिंडोरी, पुणे, छत्रपती संभाजीनगर, सोलापूर, अहमदनगर आणि जळगाव येथे एकाचवेळी हा उपक्रम अमलात आणला जाणार आहे. लोकांनी ताटे घेऊन जायचे. वापरून स्वच्छ करून आणून देणे यात अपेक्षित आहे, असे केंद्रप्रमुखांनी सांगितले. त्यासाठीचे संपर्क क्रमांकदेखील जाहीर केले आहेत.
आता पाळी माणसांची आहे. कारण माणसांनी चालवलेला प्लास्टिकचा गैरवापर आणि त्याचा कचरा कुठेही आणि कसाही फेकण्याची बेपर्वा वृत्ती या समस्येत भरच घालते. वापर कुठला, हव्यास म्हणायची वेळ माणसाने आणली आहे का? माणसे दरवर्षी सुमारे चारशे दशलक्ष टन प्लास्टिक कचरा तयार करतात, असे सांगितले जाते. हा आकडा संख्येत लिहा, असे सांगितले तर म्हणजे एकावर किती शून्य ते किती जण ठामपणे सांगू शकतील? एका दमात ती संख्या वाचू शकतील? त्याच माणसाच्या सवयी हा कचरा निर्माण करतात.
एकदा वापरून फेकून दिल्या जाणार्या प्लास्टिकवर सरकार अनेकदा बंदी घालते. त्या बंदीचा माणसेच फज्जा उडवतात. साधीशी गोष्ट! हातात कापडी पिशवी घेऊन घराबाहेर पडणे माणसे विसरली आहेत. किंबहुना कापडी पिशवी हातात दिसणे ‘ओल्ड फॅशन’ वाटते. मागासलेपणाचे लक्षण वाटते. अशा अनेक सवयीच आता सृष्टी आणि माणसाच्या मुळावर उठत आहेत. माणसाने त्याच्या सवयी बदलल्या तर समस्येला काही प्रमाणात नक्कीच आळा बसू शकेल.
प्लास्टिकचा मर्यादित वापर, शक्य असेल तिथे अजिबात न वापरणे, थर्माकोलचा वापर टाळणे, कचरा कुठेही न फेकणे या त्यापैकी काही सवयी सांगता येतील. माणसांना पर्याय दिले तर कदाचित सवयी बदलणे शक्य होऊ शकेल. त्याची सुरूवात श्री स्वामी समर्थ केंद्राने केली आहे. समाज या पुढाकाराचे स्वागत करून त्याचा अंगीकार करील, अशी अपेक्षा आहे.