रस्ते अपघात आणि त्यात होणारे मृत्यू ही समस्या दिवसेंदिवस जटिल होत आहे. अपघातांना आळा घालण्यासाठी कायदे आहेत. त्याचे नियम आहेत. दोषींना शिक्षेची तरतूद आहे. पण अपघात कमी होत नाहीत. महाराष्ट्रात रोज सुमारे 40 अपघात होतात. महामार्ग पोलिसांच्या आकडेवारीत तसा निष्कर्ष नमूद आहे. 2023-24 या वर्षात रस्ते अपघातात सुमारे 15 हजार व्यक्तींचा मृत्यू झाला.
सामान्यतः खराब आणि खड्डेयुक्त रस्त्यांना पर्यायाने प्रशासकीय यंत्रणेलाच रस्ते अपघातांसाठी जबाबदार धरले जाते. खराब रस्ते हे अपघातांचे प्रमुख कारण आहेच. किंबहुना, दर्जेदार रस्ते हा नागरिकांचा हक्क आहे. तसे रस्ते बांधणे हे प्रशासकीय यंत्रणेचे प्रमुख कर्तव्य आहे. तथापि ते पार पाडले जात नाही याची साक्ष जागोजागचे उद्ध्वस्त रस्ते देतात. यंत्रणेत गुणवत्ता नियंत्रण विभाग असतो. मार्गदर्शक तत्त्वे असतात. कामाची देखरेख करणे हा त्याचाच एक भाग आहे.
तरीही रस्ते खराब होतात कसे? बांधल्यानंतर बहुसंख्य रस्ते एक-दोन वर्षात खड्ड्यात जातात कसे? हे कोडे जनतेला कधीही सुटत नाही. तथापि रस्ते अपघातांचा दोष प्रत्येक वेळी खराब रस्ते आणि यंत्रणेला देऊन चालणार नाही. अपघातांची अन्य कारणे वाहनचालकांच्या सामूहिक बेपर्वाईकडे लक्ष वेधून घेतात. अतिवेग, नियम धाब्यावर बसवणे, सिग्नल न पाळणे, चुकीच्या बाजूने वाहन पुढे काढणे, मद्य पिऊन गाडी चालवणे, पुरेशी विश्रांती न घेता सतत काही तास वाहन चालवल्याने येणारी डुलकी ही त्यापैकी काही कारणे.
जी रस्ते अपघातांसाठी वाहनचालकांना देखील जबाबदार ठरवतात. कारण नियमपालन ही जशी यंत्रणेची तशीच वाहनचालकांचीदेखील जबाबदारी आहे. तथापि या बाबतीत सार्वत्रिक निराशा आढळते. नियम पाळण्यासाठी नसतात, असाच समज झाला असावा. परिणामी छोट्या रस्त्यांपासून महामार्गांवर वाहनचालकांचीच मनमानी आढळते. अटल बोगदा किंवा समृद्धी महामार्गावर त्यांच्या उद्घाटनाच्या दिवशीच अपघात झाले नसते. ते रस्ते तर खराब नव्हते. नियम न पाळण्याची वृत्ती हे त्याचे एक कारण नोंदवले गेले.
अपघात होऊन प्रसंगी जीव धोक्यात येऊ शकतो, याची भीती कोणालाच का नसावी? म्हणजे जीव गेला तरी बेहत्तर पण वाहतुकीचे नियम पाळणार नाही ही कोणती वृत्ती फोफावत आहे? रस्ते अपघातातील तरुणांचे मृत्यू कुटुंब उद्ध्वस्त करतातच. पण कायमचे अपंगत्व चालकाला वेदनेच्या, परावलंबित्वाच्या आणि त्यांच्या कुटुंबाला हलाखीच्या खाईत कायमचे लोटते. याचे भान वाहनचालकांना कधी येणार हा खरा प्रश्न आहे. तेव्हा अपघात टाळणे हे यंत्रणा आणि वाहनचालकांच्याही हातात आहे याची जाणीव रुजण्यासाठी अजून किती अपघात घडावे लागतील?