समाज माध्यमांवर आणि माध्यमांमध्ये खड्ड्यात गेलेले रस्ते धुमाकूळ घालत आहेत. रस्ते असा शब्द टाकून इंटरनेटवर शोध घ्यायचा प्रयत्न केला तर ओळीने राज्यातील खड्ड्यांचा पंचनामा आढळतो. केवळ शहरांतर्गतच नव्हे तर महामार्गांचीदेखील दुरवस्था झाली आहे.
नाशिक-मुंबई रस्ता हा तर नाशिककरांच्या तीव्र संतापाचा आणि समाज माध्यमांवर विनोदाचा विषय झाला आहे. लहानपणी मुलांना नेहमी गोष्ट सांगितली जायची. त्या गोष्टीतील लोक एका गावाहून निघून मजल-दरमजल करत दुसर्या गावी पोहोचायचे. म्हणजे कसे त्याचा अनुभव नाशिकहून मुंबईला जाणारे नाशिककर सध्या घेत आहेत. नाशिक-पुणे हा रस्ता प्रवास म्हणजे वैताग आहेच. त्यात मुंबई रस्त्याची भर पडली आहे. गंतव्य ठिकाणी विमानाने, रेल्वेने किंवा रस्त्याने जाता येते. पण खराब हवामानामुळे विमानसेवा विस्कळीत होऊ शकते.
अतिपावसामुळे रेल्वेगाड्या रद्द होऊ शकतात. अशावेळी रस्ता हा एकच पर्याय लोकांपुढे असतो. ते रस्तेच खड्ड्यात गेले आहेत. दरवर्षीच्या पावसाळ्यात रस्ते नेहमीच खड्ड्यात कसे जातात, हा ‘देशदूत’च्या नेहमीच जिव्हाळ्याचा विषय राहिला आहे. या मुद्यावर ‘देशदूत’ तज्ज्ञांना बोलते करत आला आहे. रस्त्याचा उद्देश आणि त्याच्या वापरानुसार त्याचा आराखडा तयार होतो. त्यानुसार रस्ता डांबरी बांधायचा की काँक्रिटचा हे ठरू शकते. तथापि रस्त्यांची नियमित देखरेख आणि रस्ता बांधताना पाणी वाहून जाण्याची सोय करणे याला पर्याय नाही यावर मात्र विविध तज्ज्ञांचे एकमत आढळते. रस्ते बांधायचे तंत्र आहे. शास्त्रीय पद्धत आहे. ते त्याच पद्धतीने बांधले गेले तर ते दीर्घकाळ टिकतात. तथापि रस्ते घाईत बांधले जाताना आढळतात. त्यात तंत्राचा बळी जाण्याचा धोका नेहमीच असतो.
पाणी वाहून जाण्यासाठी दोन्ही बाजूंनी उतार ठेवावा लागतो. रस्ते बांधताना अंतर्गतदेखील तशी सोय ठेवावी लागते. ती एकदा करणे पुरेसे नसते. तिची सच्छिद्रता राखावी लागते. विशेषतः पावसाळ्यापूर्वी त्यादृष्टीने तपासणी केली जाणे अत्यंत आवश्यक आहे. पण ते तसे घडते का? घडत असते तर रस्ते दरवर्षी खड्ड्यात गेले असते का? रस्ते घाईत का बांधले जातात? ते कसे बांधले जातात? याचे गमक लोकांनाही माहीत आहे. वारंवार दुरूस्त करावे लागणारे रस्ते आणि त्यासाठी मंजूर केला जाणारा कोट्यवधींचा निधी यातच रस्त्याच्या दुरवस्थेचे गमक दडलेले असते, हे लोकही आता पुरते ओळखून आहेत.
तथापि दबाव गट निर्माण करून नागरी समस्यांकडे लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न करणे ही नागरिकांचीदेखील जबाबदारी आहे. नाशिक-मुंबई रस्त्यासाठी नाशिकमधील सुमारे वीसपेक्षा जास्त संस्था नुकत्याच एकत्र आल्या होत्या. रास्ता रोको करण्याचा इशारा त्यांनी दिला होता. त्याची दखल सरकारला घ्यावी लागली. महामार्ग तातडीने दुरुस्तीचे आश्वासन सरकारने दिले. ते आश्वासन सरकार सर्वच रस्त्यांच्या बाबतीत पाळेल, भविष्यात रस्ते तंत्रानुसार बांधले जातील आणि नागरिकांना मनस्ताप होणार नाही याची दक्षता सरकार घेईल अशी अपेक्षा करावी का?