Thursday, July 4, 2024
Homeसंपादकीयसंपादकीय : २ जुलै २०२४ - नुसते वृक्षारोपण पुरेसे नाही

संपादकीय : २ जुलै २०२४ – नुसते वृक्षारोपण पुरेसे नाही

जमिनीचे पुनर्वसन, वाळवंटीकरण आणि दुष्काळ निवारण ही या वर्षीची जागतिक पर्यावरण दिवसाची संकल्पना होती. या तीनही पातळ्यांवर माणसाने चिंता करावी अशी परिस्थिती अनुभवास येते. अनेक जागतिक अहवालांचे निष्कर्ष त्याकडे लक्ष वेधून घेतात. नापीक होत चाललेली जमीन हा जागतिक चिंतेचा विषय आहे. मातीचा वरचा सुपीक थर नष्ट होत चालला आहे. जमिनीचे मोठ्या प्रमाणात वाळवंटीकरण होण्याचा धोका वाढत आहे. त्यामुळेच अनेक सामाजिक संस्थांनी ‘माती वाचवा’ ही जागतिक चळवळ सुरु केली आहे.

- Advertisement -

संयुक्त राष्ट्राच्या एका अहवालानुसार सुमारे चाळीस टक्के जमीन नापीक झाली आहे. परिणामी वारंवार दुष्काळ पडतो. जगातील उपाशी लोकांची संख्या सातत्याने वाढते. जागतिक पर्यावरण दिवसाच्या संकल्पनेला बळ देण्यासाठी वृक्षारोपण हा एक प्रभावी मार्ग आहे. चांदवड पंचायत समिती, निमोण ग्रामपंचायतीसह सामाजिक संस्थांनी दरेगाव परिसरातील डोंगरांवर मोठ्या प्रमाणात झाडे लावण्याची मोहीम सुरु केली आहे. आगामी काळात जलसंधारणाचे काम देखील हाती घेण्याचा मानस त्यांनी माध्यमांकडे व्यक्त केला आहे. रोपण केल्यावर पाच वर्षे झाडांचे संगोपन करण्याचे नियोजन त्यांनी जाहीर केले आहे.

वृक्षारोपण हे एक शास्त्र आहे. शक्यतो स्थानिकच झाडे लावावीत असा आग्रह तज्ज्ञ धरतात. स्थानिक ठिकाणचे वातावरण झाडांना आणि त्याच्या परिसंस्थेला पोषक असते. अशी झाडे पक्षांचा हक्काचा निवारा बनतात. त्याचा अभ्यास न करता जिथे जागा मिळेल तिथे मनाला येतील ते वृक्ष लावणे आणि समाजमाध्यमांवर छायाचित्रे टाकण्यापुरती वृक्षारोपण मोहीम राबवणे याकडेच अनेकांचा कल आढळतो. काही काळापासून ‘सीड बॉल’ तयार करून त्याचे वाटप केले जाताना आढळते. वाट्टेल तिथे ते फेकले म्हणजे झाडे लागतील असा गैरसमज देखील आढळतो. तथापि त्याचीही एक पद्धत आहे.

स्थानिक वृक्षांच्या बियांचे बॉल बनवले जावेत. विशिष्ट ठिकाणी ते फेकले तर नंतर त्यावर लक्ष ठेवता येऊ शकेल. अन्यथा, अनेक सीड बॉलमधून झाडे उगवतात. पण त्यांची काळजी घेतली न गेल्याने असे वृक्षारोपण निरर्थक ठरू शकण्याचा धोका पर्यावरण तज्ज्ञ व्यक्त करतात. त्यामुळे झाडे लावण्याबरोबरच ते वाढीला लागेपर्यंत त्यांची काळजी घेणे गरजेचे आहे. स्वयंस्फूर्तीने असे काम करताना माणसे अवतीभवती आढळतात. माणसे पाण्याची बाटली घेऊन सकाळी फिरायला जातात आणि झाडांना पाणी घालतात. काही माणसे झाडांना कुंपण घालतात. अनेक माणसे डोंगरउताराला झाडे लावतात. वृक्षारोपण सार्थ ठरवू पाहाणार्‍या अशा व्यक्तींची आणि संस्थांची संख्या वाढणे काळाची गरज आहे. त्याचे समाज स्वागतच करेल.

- Advertisment -

ताज्या बातम्या