मुलांना शालेय सुट्टीचे वेध आतापासूनच लागले आहेत. मुले सुट्टीची वाट का पाहतात याचे उत्तर कवी माधवानुज त्यांच्या कवितेतून देतात. ‘रोज रोज शाळा पुरे ती आला कंटाळा, चार दिवस आता मनाला कसली ना चिंता, उडू बागडू जशी पाखरे स्वैर अंतराळी’ असे ते म्हणतात. सुट्टीचे नेमके काय करायचे याचा विचार पालकांनी करावा, पण सुट्टीतील मुलांच्या स्वप्नांचे मनोवेधक वर्णन अनंत भावे करतात. ‘सुट्टीच्या दिवसात वाटते खुशाल आकाशात उडावे, इंद्रधनूच्या घसरगुंडीवर वर-खाली करावे’ अशा आवडीच्या गोष्टी करता करता सुट्टी कधी संपते आणि कालवेळेचे भान कसे सुटते असा प्रश्न मुलांना पडतो, असे कवी म्हणतात.
तात्पर्य, वेळापत्रकबद्ध वर्षात आनंद निर्माण करणार्या ज्या अवांतर गोष्टी मुलांना करता येत नाहीत त्या गोष्टींसाठी मुले सुट्टीची वाट बघतात. मुले सुट्टीत काय काय करू शकतात ही ‘मन की बात’ पंतप्रधानांनीदेखील नुकतीच सांगितली. तथापि मुलांच्या सुट्टीचा ताण पालकांना का बरे येत असावा? त्यांना सुट्टीतही कोणत्या तरी आकृतिबंधात अडकवून टाकण्याचा विचार बहुसंख्य पालक का करत असावेत? मुले सुट्टीत मोबाईलच घेऊन बसतील, अशी भीती पालक व्यक्त करतात. पण मुलांनी तसे करू नये यासाठी पालकांनाच वेगळा विचार करावा लागेल. मुलांचे सामाजिकीकरण करण्याची आणि उपक्रमांमधून त्यांना जीवन कौशल्ये शिकवण्याची संधी सुट्टी मिळवून देते.
पाठ्यपुस्तकांच्या पलीकडच्या जगाची ओळख सुट्टीत करून दिली जाऊ शकेल. शिबिरे, निसर्गसान्निध्य, बैठे आणि मैदानी खेळ, स्वयंपाक शिकणे हे झाले नेहमीचे पण काही ना काही शिकवणारे उपक्रम. सर्जनशील पालक त्यात अनेक विविधता आणू शकतील. हे उपक्रम मुलांना काय शिकवतात? जय आणि पराजय सहज स्वीकारायला, एकमेका सहाय्य करायला, इतरांच्या गुणांचे कौतुक करण्यासहीत भाषा वैविध्य, स्वावलंबन, बंधुभाव, समता अशी अनेक मूल्ये मुले त्यांच्याही नकळत यातून शिकतात. अनुभवसमृद्ध होतात. त्यांच्यात समतोल दृष्टिकोन विकसित होतो.
एरवी पालकांच्या व्यस्ततेमुळे मुले आणि पालक यांच्यातील संवाद अभावानेच घडतो. संवाद म्हणून जे काही घडते ते केवळ दिनचर्येचे अदानप्रदान असते असे म्हणणे चूक ठरू शकेल का? सुट्टीच्या काळात ही उणीव दूर केली जाऊ शकेल. काही गोष्टी पालक आणि मुले एकत्र मिळून करू शकतील. यातून त्यांच्यात सहवास घडेल. निवांत गप्पा होतील. मुलांच्या संवर्धनात त्याचेही महत्त्व आहेच. अजून एका महत्त्वाच्या मुद्यावर विचार होऊ शकेल. सुट्टीत मुलांना लोळू द्या. निवांत झोपू द्या. काही दिवस काहीही न करता त्यांच्या मनाप्रमाणे घालवू द्या आणि त्याचा आनंद घेऊ द्या.