वसुंधरेवरील सर्व प्रकारच्या कचर्याचे ओझे आणि त्यामुळे होणारे प्रदूषण वाढत आहे. रोज निर्माण होत असलेल्या कचर्याचे नेमके काय होते असा प्रश्न नागरिकांना अभावाने सुद्धा पडत नसावा का? कचरा निर्माण करण्याची गती स्वयंपातळीवर कमी करता येऊ शकेल, कचर्याचे व्यवस्थापन केले जाऊ शकेल याची जाणीव ही फार दूरची गोष्ट ठरू शकेल. ओला आणि सुका कचरा वेगवेगळा करणे हे देखील एक प्रकारचे कचर्याचे व्यवस्थापन मानले जाते.
नाशिक महानगरपालिका क्षेत्रात घंटागाड्या रोज कचरा संकलित करतात आणि खत प्रकल्पात पोहोचवतात. नागरिकांनी ओला आणि सुका कचरा वेगवेगळा करून द्यावा आणि घंटागाडी कर्मचार्यांनी तशाच स्वरूपात तो स्वीकारावा असे आदेश आयुक्तांनी नुकतेच दिले आहेत. घंटागाड्यांमध्ये तशा सुविधा नसतील तर कारवाई करण्याचा इशारा त्यात नमूद आहे. याआधीही असे बंधन घातले गेले होते. इतकेच नव्हे तर विविध आस्थापनांसाठी ओल्या आणि सुक्या कचर्याच्या डब्यांचे रंग देखील निश्चित केले गेले होते. तथापि कोणत्याही शासकीय आदेशांची अवस्था ‘नव्याचे नऊ दिवस’ अशी का होत असावी? नियम पाळण्यासाठी असतात ही जाणीव का रुजू नये? बहुसंख्य घरांमध्ये फुलांच्या कुंड्या असतात.
काही घरांमध्ये गच्चीवरची बाग फुलते. या बागेसाठी ओल्या कचर्यापासून घरच्या घरी उत्तम खत बनू शकते. अनेक सामाजिक संस्था या क्षेत्रात स्वयंस्फूर्त काम करतात. खत बनवण्याची प्रक्रिया शिकवतात. मुंबईसारख्या मोठ्या महानगरांमधील अनेक गृहनिर्माण संस्था त्यांच्या पातळीवर तसे व्यवस्थापन करत असतात. तथापि सगळ्यांनाच त्याची आवड असू शकेल आणि तसे करण्याइतका वेळ असू शकेल असे संभवत नाही. तथापि कचरा साठवताना त्याचे दोन भागात वर्गीकरण करणे मात्र सहज शक्य असते. तरीही तसे केले जाताना आढळत नाही. म्हणूनच असे आदेश वारंवार काढण्याची वेळ प्रशासनावर येत असावी.
संकलित कचर्यापासून खत निर्मिती प्रकल्प अनेक शहरात राबवले जातात. त्यासाठीही ओला कचरा वेगळाच असणे ही प्राथमिक अट असतेच. तथापि याबाबतचे सामाजिक भान आढळत नाही. इतकी साधी गोष्टही लोक अमलात का आणत नाहीत? लोक कचरा कुठेही कसाही फेकतात. त्याचा त्रास लोकांनाच होतो.सामान्यांच्या पातळीवर कोणतीही गोष्ट अमलात आणणे बंधनकारकच का करावी लागते याचा विचार लोकांनी करण्याची वेळ आता आली आहे. कारण कचरा वाढतच आहे. ते ओझे सहन होईनासे झाले की निसर्ग त्याची परतफेड कशी करतो हे मोठ्या भरतीनंतर पाणी ओसरलेले समुद्रकिनारे याची अनेकदा साक्ष देतात. याची जाणीव कधी होणार?