Tuesday, July 16, 2024
Homeसंपादकीयसंपादकीय : ३ जुलै २०२४ - अनाठायी धाडस जीवघेणे!

संपादकीय : ३ जुलै २०२४ – अनाठायी धाडस जीवघेणे!

पावसाळा सुरू होताच पावसाळी पर्यटनावर अनेक ठिकाणी बंदी घालण्यास आणि त्याविषयीच्या मार्गदर्शक सूचना जाहीर होण्यास सुरुवात झाली आहे. यासंबंधीच्या बातम्या प्रसार माध्यमांत प्रसिद्ध होत आहेत. वन्यजीव विभागाकडून भीमाशंकर अभयारण्याच्या वाटा सप्टेंबरपर्यंत बंद करण्यात आल्या आहेत. त्र्यंबकेश्वर परिसरातील विविध ठिकाणांसाठी वनविभागाने मार्गदर्शक सूचना प्रसिद्ध केल्या आहेत.

- Advertisement -

राज्यातील पर्यटनस्थळे सुरक्षित करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी प्रशासनाला दिले आहेत. ज्या क्षेत्रांवर अशा उपायोजना करणे शक्य नाही, अशी पर्यटनस्थळे तूर्तास बंद करण्याचे आदेश पुणे जिल्हाधिकार्‍यांनी काढले आहेत. अशी वेळ प्रशासनावर का आली? याचे उत्तर गेल्या पाच-सहा दिवसांतील काही दुर्दैवी घटनांनी दिले आहे. पाण्याचा, समुद्राचा आणि धबधब्यांच्या खोलीचा अंदाज न आल्याने काही पर्यटकांचा मृत्यू झाला आहे.

अलीकडच्या काळात अशा घटनांमध्ये वाढ झाली आहे. अतिधाडस, निसर्गाला गृहीत धरण्याच्या वृत्तीत होत चाललेली वाढ, मित्रांना काहीतरी करून दाखवण्याची खुमखुमी आणि फाजील आत्मविश्वास ही त्यामागची काही कारणे आहेत. समाज माध्यमांवर रिल करून टाकणे आणि वाहवा मिळवणे याची त्यात आणखी भर पडली आहे. समाज माध्यमांचा प्रभाव वाढल्यापासून अशा ठिकाणांना भेटी देणार्‍या हौशा-नवशा-गवशांची गर्दी वाढत आहे.

खरे तर निसर्गाच्या सान्निध्यात काही काळ घालवणे, त्याची विविध रूपे अनुभवणे, त्यानिमित्त पशुपक्ष्यांचा दूरस्थ सहवास अनुभवून ताजेतवाने होणे हा एक उद्देश असावा, असे तज्ज्ञ आणि जाणत्यांना अपेक्षित आहे. अशी स्थळे परिचित नसतात. त्या वाटा अनवट असतात. त्यामुळे अशा ठिकाणी स्थानिकांच्या सूचनांचा आदर करणे किंवा मार्गदर्शकासमवेत स्थळदर्शन करणे हिताचे ठरते. तथापि पर्यटनस्थळी जाऊन प्रचंड गोंधळ घालणे, मद्य पिऊन अंगविक्षेप करून नाचणे आणि हुल्लडबाजी करण्याकडेच कल वाढलेला आढळतो.

परिणामी दुर्घटना घडून अनेकांचे मृत्यू ओढवतात. अनेक ठिकाणांवर बंदी घातली जाते. मार्गदर्शक सूचनांचे फलक लावलेले आढळतात. त्याची दखल किती पर्यटक घेतात? गर्दी व्यवस्थापनाचा विचार करणे सरकारचे कर्तव्य आहे. ते सरकारने पार पाडायला हवे. बंदी घालणे हा त्यावरचा उपाय ठरू शकत नाही. तथापि नागरिकांच्या कर्तव्याचे भान किती जणांना आढळते? माऊंट एव्हरेस्टपासून विविध पर्यटनस्थळांवर पर्यटकांच्या बेशिस्तीमुळे साचणारा कचरा हा चिंतेचाच विषय आहे.

सामाजिक भान हरवत चालल्याची ही लक्षणे मानावीत का? मागच्यांच्या चुकांमधून माणसे धडे घेतील, अतिधाडस टाळतील, सेल्फी आणि रिल्सच्या वेडाला निदान धोकेदायक ठिकाणी तरी आवर घालतील आणि त्यांच्यासह इतरांचे जीव धोक्यात घालणार नाहीत, अशी अपेक्षा करावी का?

- Advertisment -

ताज्या बातम्या