Friday, April 25, 2025
Homeसंपादकीयसंपादकीय : ४ एप्रिल २०२५ - सर सलामत तो हेल्मेट पचास

संपादकीय : ४ एप्रिल २०२५ – सर सलामत तो हेल्मेट पचास

दुचाकी वाहनचालकांनी वाहन चालवताना हेल्मेट वापरावे यासाठी सरकारने पुन्हा एकदा प्रयत्न केला आहे. देशांतर्गत विकल्या जाणार्‍या प्रत्येक दुचाकीसोबत आयएसआय प्रमाणित दोन हेल्मेट देणे बंधनकारक केले आहे. तशी माहिती संबंधित खात्याच्या मंत्र्यांनी माध्यमांना नुकतीच दिली. आता या मुद्यावर पुन्हा एकदा क्रिया-प्रतिक्रियांचे घमासान सुरू होईल. का घालायचे आणि का घालत नाही याची असंख्य कारणे सांगितली जातील.

दाव्यांच्या पुष्ट्यर्थ तज्ज्ञांच्या मतांचा आधार घेतला जाईल. सक्ती हवी की नको यावर वादविवाद झडतील. पोलीसही सतर्क होतील. कदाचित हेल्मेट न घालणार्‍यांना दंड ठोठावण्याची मोहीम अचानक गतिमान होऊ शकेल. काही काळानंतर विषयाला आलेली उकळी थंड होईल आणि हेल्मेट डोक्यांऐवजी गाडीला लटकताना आढळतील. याआधीही जेव्हा जेव्हा हा विषय चर्चेला आला तेव्हा तेव्हा असेच घडले आहे. यासंदर्भात नियम आहेत. जबर आर्थिक दंडाची तरतूद आहे. आता गाडीबरोबरच हेल्मेटही घरात येणार आहे. प्रश्न आहे तो लोकांच्या मानसिकतेचा. ते घालत नाहीत हीच खरी समस्या आहे. त्यांनी ते घालावेत यासाठीच अशी कसरत सरकार अधूनमधून करते. जशी ती आता केली आहे.

- Advertisement -

नियम न पाळण्याची वृत्ती याच्या मुळाशी आहे. केवळ हेल्मेटच नव्हे तर वाहतुकीशी संबंधित नियम बहुसंख्य वाहनचालक पाळत नाहीत. नियम धाब्यावर बसवण्यासाठीच असतात असाच समज खोलवर रुजलेला आढळतो. परिणामी सिग्नल तोडणे, एकेरी वाहतूक न करणे, आवश्यक ती कागदपत्रे जवळ न बाळगणे आणि हटकले तर अरेरावी करणे हेच रस्तोरस्ती घडते. हेल्मेट परिधान केले तर अपघातात जीव धोक्यात येण्याची जोखीम कमी होते यावर तज्ज्ञांचे एकमत आढळते. तथापि बहुसंख्य वाहनचालक त्यांच्या वाहन चालवण्याच्या कौशल्यावर विश्वास व्यक्त करतात.

क्षणभर तो त्यांच्यापुरता खरा मानला तरी समोरून येणारा वाहनचालक तितकाच दक्ष असू शकेल का? समोरचे वाहन अचानक धडकून कितीतरी अपघात घडतात. रस्ते अपघातांमध्ये युवा पिढीच्या मृत्यूच्या वाढत्या प्रमाणाबद्दल नेहमीच चिंता व्यक्त केली जाते. नेमकी याच पिढीत कायदा मोडण्याची आणि कायद्याचा आदर न करण्याची वृत्ती बळावत आहे. एका अर्थाने हे यंत्रणेचेदेखील अपयश मानले जायला हवे. कायद्याचा धाक निर्माण करण्यात यंत्रणा अपयशी ठरते. चूक झाली तरी फारसे काही बिघडत नाही, चिरीमिरी देऊन सुटून जाऊ शकतो, असा विश्वास का निर्माण होतो याचा विचार यंत्रणेनेदेखील करण्याची गरज आहे. कोणाचीही भिडभाड न ठेवता कायद्याची कठोर अंमलबजावणी आणि त्याबरोबरीने मानसिकता बदलाचे सातत्यपूर्ण प्रयत्न हाच यावरचा सद्यस्थितीतील व्यवहार्य उपाय ठरावा.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

शासकीय

Nashik News: शासकीय कार्यालकांकडे थकला कोट्यावधी रुपयांचा कर; मनपासमोर थकबाकी वसुलीचे...

0
नाशिक | प्रतिनिधी नाशिक मनपा कर विभाग सामान्य नागरिकांची घरपट्टीची थकबाकी वसूल करण्यासाठी त्यांच्या मालमत्तांचा लिलाव करण्याची तयारी करीत आहे. मात्र दुसरीकडे शासकीय कार्यालयांकडेच मनपाची...