लहान मुलांच्या हातात पुस्तके दिसत नाहीत. त्याऐवजी आता मोबाईल दिसतात. त्यामुळे त्यांना कोणतेही प्रश्न पडतच नाहीत. कशाची उत्सुकताही वाटत नाही. त्यांना गोष्टी सांगण्यातील आणि पुस्तक वाचनातील आनंद हिरावला गेला आहे, अशी भावना प्रख्यात अभिनेते सुबोध भावे यांनी नुकतीच व्यक्त केली आहे. अनेक जाणकारांनीही यापूर्वी या मुद्यावर बोट ठेवून पालक आणि समाजाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला आहे. मानसतज्ज्ञसुद्धा त्याबद्दल वारंवार चिंता व्यक्त करतात. मुलांच्या सर्वांगीण विकासात पुस्तके किती महत्त्वाची भूमिका बजावतात ते वेगळे सांगायला नको. पुस्तक वाचन समतोल विचारसरणी रुजवते. दृष्टिकोन व्यापक बनवते.
बदलत्या सामाजिक परिस्थितीत ही मूल्ये मुलांमध्ये रुजणे आवश्यक आहे. सुबोध भावे यांनी व्यक्त केलेले विचार बहुसंख्य पालकांना रुचतील आणि ते सहमतही होतील. विषय मुलांच्या पुस्तक वाचनाचा असला तरी किती पालक स्वतः पुस्तके वाचतात? किती मुलांच्या घरी त्यांच्या पालकांचा पुस्तक संग्रह असेल? मुलांना वाचन सवय कशी लावायची याचे अनेक कानमंत्र जाणकार देतात. उदा. मुलांना पुस्तकांची ओळख करून द्या. त्यांच्यासोबत पुस्तक खरेदीला जा. त्यांना त्यांच्या आवडीची पुस्तके खरेदी करू द्या. आठवड्यातून एकदा त्यांना त्यांच्या आवडीचे पुस्तक वाचून दाखवा… वगैरे वगैरे! तथापि हे कानमंत्र अमलात आणण्यासाठी पालक पुस्तकप्रेमी असायला हवेत. मुलांच्या वाचनात मोबाईल हा अडथळा आहे हे कबूल, पण पालकांनाच वाचनाची आवड नसेल तर ते तरी त्यांच्या पाल्यांना वाचनास कसे प्रवृत्त करू शकतील? सर्वप्रथम मुले पालकांना वाचतात.
पालकांच्या हातात सदासर्वकाळ मोबाईलच दिसणार असेल व तासन्तास ते त्यातच मग्न असतील तर ते पाल्यांना त्यापासून दूर कसे ठेवू शकतील? आजचा काळ ‘डिजिटल’ शिक्षणाचा आहे. त्यामुळे मुलांच्या हातात मोबाईल देणे अपरिहार्य असू शकेल कदाचित, पण याच मोबाईलचा वापर वाचनासाठीसुद्धा केला जाऊ शकतो. समाज माध्यमांवर वाचनप्रेमींचे अनेक समूह असतात. त्यावर वाचनाशी संबंधित अनेक उपक्रम चालतात. अनेक वाचन अॅप उपलब्ध आहेत. त्यावर पुस्तके वाचता येतात. तथापि हा बदल घडून यावा व मुलांना वाचनाची सवय लागावी, असे वाटत असल्यास ती सवय आधी पालकांनी स्वतःला लावून घेतली पाहिजे. त्यासाठी पालकांना स्वतःला बदलावे लागेल. मोबाईलला काही काळ बाजूला ठेवावे लागेल. तरच मुलांवर वाचनसंस्कार करता येतील.




