समाज माध्यमांच्या आहारी जाणे कुटुंब संस्थेच्या मुळावर उठत आहे. घटस्फोटांचे प्रमाण वाढत असून त्याचे एक प्रमुख कारण समाज माध्यमे हे आहे. घटस्फोटांचे प्रमाण देशात महाराष्ट्रात सर्वाधिक आहे. एका सर्वेक्षणामधील या निष्कर्षाने नुकतेच सर्वांचे लक्ष वेधून घेतले. अशी सर्वेक्षणे अधूनमधून होत असतात. या मुद्याकडे देशातील मानसतज्ज्ञही सातत्याने लक्ष वेधून घेत आहेत.
नाशिक जिल्ह्यात 2024 मध्ये याच कारणावरून घटस्फोटाची मागणी करणारे सुमारे सातशे अर्ज दाखल झाले आहेत. देश आणि राज्यातील अन्य मोठी शहरेही त्या वाढीला अपवाद नसावीत. विश्वास, संवाद, एकमेकांना वेळ देणे आणि एकमेकांप्रती जिव्हाळा हा जोडप्यांच्या नात्याचा आधार असतो. जोडप्यांचा एकेकट्याने होणारा समाज माध्यमांवरील वावर या आधाराला सुरुंग लावणारा ठरतो. नात्यांमध्ये वाद, भांडणे, मतभेद होऊ शकतात. कोणतीही पिढी त्याला फारशी अपवाद नसू शकेल. तथापि संवादाचा पूल बांधून एकमेकांना समजून घेऊन प्रसंगी माफी मागून नाते टिकवण्यासाठी एक पाऊल मागे घेतले गेले तर नाते अबाधित राहायला ते सहाय्यभूत ठरते. याचा अनुभव मागच्या अनेक पिढ्या घेत आल्या आहेत.
पण समाज माध्यमांमुळे माणसे आभासी जगात रमतात. त्यातून त्यांच्या अपेक्षा वाढीस लागतात. त्या जगातील वावर आकर्षक वाटू लागतो. माणसे एकमेकांचे खोटे किंवा दिखाऊ कौतुक करतात. त्यामुळे अहंकार पुष्ट होतो. तीच अपेक्षा वास्तविक जगातील जोडीदाराकडून करणे नकळत सुरू होते. आभासी आणि वास्तवात फरक करण्याचा विवेक नष्ट होतो. सहनशक्ती संपुष्टात येते. परस्परांचा सहवास कमी होतो किंवा अनेकांना नकोसादेखील होत असू शकेल. त्याचा थेट परिणाम कुटुंबावर होतो. यात जोडप्याला मूल असेल तर त्याच्यावर जास्त गंभीर परिणाम होतात. मूल होणे म्हणजे जोडप्याने आई-बाबा होणे.
आई-बाबा होणे हादेखील एक प्रवासच आहे. मूल झाल्यावर जोडप्यांचा आई-बाबा म्हणून प्राधान्यक्रम बदलतो, असे डॉक्टरदेखील बजवतात. पण समाज माध्यमांमुळे ‘स्व’ चुकीच्या पद्धतीने पोसला जात असल्याने या सगळ्याच जबाबदार्यांचा माणसांना विसर पडत असावा. अवास्तव अपेक्षा एकमेकांकडून पूर्ण झाल्या नाही की जोडपी समाज माध्यमांवर आधार शोधतात आणि तो त्यांना मिळतोदेखील. आभासी जगातील हीच नाती जोडप्यांच्या एकमेकांशी जमवून घेण्यातील अडथळा ठरतात, असे तज्ज्ञांचेदेखील निरीक्षण आहे. वाढता संशय त्यात तेल ओततो आणि नाती न्यायालयाच्या दारात पोहोचतात. सध्या हेच घडताना आढळते. ही परिस्थिती कशी बदलायची हेच खरे आव्हान आहे.