Monday, July 8, 2024
Homeसंपादकीयसंपादकीय : ५ जुलै २०२४ - धोक्याची घंटा

संपादकीय : ५ जुलै २०२४ – धोक्याची घंटा

2030 पर्यंत देशातील सुमारे 96 टक्के लोक मोबाईल वापरकर्ते बनतील असा अंदाज राष्ट्रीय नमुना सर्वेक्षणात (नॅशनल सॅम्पल सर्वे) नमूद असल्याचे वृत्त माध्यमांत प्रसिद्ध झाले आहे. मोबाईल हे अत्याधुनिक उपकरण आहे. नवीन जगाचे संवाद साधन म्हणून त्याकडे पाहिले जाते. परिणामी कोट्यवधी लोक मोबाईल साक्षर झाले आणि त्याअर्थाने समाजाची प्रगती म्हणूनही त्याकडे पाहिले जाऊ शकेल. तथापि चित्र तितकेसे आशादायक नाही याकडेही त्याच सर्वेक्षणाने लक्ष वेधले आहे.

- Advertisement -

वापरकर्त्यांपैकी पन्नास टक्क्यांपेक्षा जास्त लोक मोबाईलवर फक्त वेळ वाया घालवतात. संगणकाच्या भाषेत कॉपी पेस्टसारखी सामान्य क्रियादेखील अनेकांना जमत नाही. मग मेल करणे, प्रेझेंटेशन किंवा भाषा तयार करणे, आर्थिक व्यवहार करणे या गोष्टी फार पुढच्या म्हणाव्या लागतील. निष्कारण वापरात लोकांचा फक्त वेळच वाया जातो का? कामाचे मानवी तास वाया जातात. जीवनशैली बैठी होते. त्याचे वेगळे दुष्परिणाम होतात. लोकांच्या विचारांची गती मंदावते.

सर्जनशीलता-एकाग्रता कमी होते. अस्वस्थता वाढते. माणसे एकटी होतात. त्यांचा समाजाशी संवाद तुटतो. कौशल्य विकासाची गरज भासेनाशी होते. कष्ट नको वाटू शकतात. तज्ज्ञही त्याकडे लक्ष वेधून घेतात. हे एकप्रकारे राष्ट्राचेदेखील नुकसानच आहे. तथापि मोबाईलचे व्यसन जडणे आणि त्याचे विविध प्रकारच्या मानसिक विकारात रूपांतरण होण्याचा मोठाच धोका असतो.

माणसांची वाटचाल त्यादिशेने सुरू झाली असावी का? पालकांनी मोबाईल दिला नाही म्हणून मुले घर सोडतात. प्रसंगी आत्महत्या करतात. मोबाईल दाखवला नाही म्हणून मुले मित्राचा जीव घेतात. मोबाईलवरून झालेले दोन मित्रांचे भांडण हिंसक बनते. ही त्याचीच काही उदाहरणे. शिवाय कौटुंबिक विसंवाद वाढत आहे. मुले आणि पालक यांच्यात संवादाची दरी वाढण्यामागे मोबाईल हेदेखील एक प्रमुख कारण मानले जाते. एकुणात मोबाईलवर लोक वाया घालवत असलेला वेळ सामाजिक अस्वस्थतेला कारण ठरू शकतो.

याशिवाय माणसांची मने चुकीच्या विचारांनी प्रभावित होऊ शकतात. नव्हे होतातही. याशिवाय माणसे आभासी जगात अडकतात. तेच जग त्यांना खरे वाटू लागते. त्यांची वास्तवाशी फारकत होते. त्यांनाही दोन चेहर्‍यांनी वावरायची घातक सवय जडते. हे जास्त गंभीर आहे. राष्ट्रीय नमुना सर्वेक्षणात त्याचेच प्रतिबिंब उमटले आहे, असे म्हटले तर वावगे ठरू नये. मोबाईलचा वापर थांबवणे किंवा बंद करणे व्यवहार्य ठरणार नाही. कारण ते व्यवहाराचेदेखील साधन बनले आहे.

काही लोक आजही मोबाईल वापरत नाहीत असे सांगितले जाते, पण अशी उदाहरणे कदाचित हाताच्या बोटावर मोजण्याइतकीदेखील नसतील हे नक्की. त्यामुळे मोबाईल वापराची साक्षरता वाढवणे, वापराच्या काळ्या बाजू वापरकर्त्यांपर्यंत पोहोचवत राहणे आणि मुलांना धोके समजावून सांगणे हेच व्यवहार्य उपाय ठरू शकतील. मुलांना मोबाईलचे व्यसन जडू नये यासाठी पालकांना वापराच्या मर्यादा पाळाव्या लागतील. दुर्दैवाने मानसिक अस्वस्थतेची शंका जरी आली तरी परिस्थितीचा स्वीकार करून तज्ज्ञांचा सल्ला घेणेदेखील गरजेचे असते, याचेही भान पालकांनी ठेवणे आवश्यक आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या