Monday, September 7, 2026
Homeसंपादकीयसंपादकीय : ०५ मार्च २०२६ - मातृत्वाची तस्करी

संपादकीय : ०५ मार्च २०२६ – मातृत्वाची तस्करी

- Advertisement -

विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोर्‍हे यांनी दैनिक ‘देशदूत’च्या विशेष संवाद कट्ट्यात राजकारणाबरोबरच महिला सक्षमीकरणाच्या प्रश्नांवर दिलखुलास मते मांडली होती. स्त्री हीच स्त्रीची शत्रू अशी वर्षानुवर्षे रूढ झालेली प्रतिमा आता बदलली पाहिजे. स्त्रियांमध्ये भगिनीभाव जागवण्याची नितांत गरज त्यांनी व्यक्त केली होती. हे आठवण्याचे कारण म्हणजे बदलापूर येथे काही दिवसांपूर्वी उघडकीस आलेले स्त्री बीज तस्करीचे प्रकरण आणि त्यातील उघड झालेले नाशिक कनेक्शन होय.

बदलापूर येथील स्त्री बीजांच्या तस्करीची पाळेमुळे हळूहळू उघड होत आहेत. गरीब, गरजू महिलांना हेरून त्यांच्या आर्थिक दुर्बलतेचा फायदा या मातृत्वाच्या तस्करीसाठी घेतला जात होता. या प्रकरणी बेकायदेशीर सोनोग्राफी करणे, एजंट म्हणून काम करणे, मध्यस्थ बनून गरीब महिलांना हेरणे असे प्रकार करणार्‍या पाच महिलांना अटक करण्यात आली आहे. एक प्रकारे महिलांनी मातृत्व तस्करीसाठी चालवलेले हे रॅकेटच म्हणावे लागेल. सध्या राज्यात आयव्हीएफ (इन-विट्रो फर्टिलायझेशन) सेंटर म्हणजे वंध्यत्वावर उपचार करणारे विशेष लिनिकचे मोठे जाळे पसरले आहे.

मूल न होणार्‍या नवजोडप्यांंसाठी हे आयव्हीएफ केंद्र म्हणजे आधुनिक मंदिरे बनली आहेत. कारण येथे भरमसाठ पैसे देऊन बोललेल्या नवसाचे ‘फलित’ नक्की मिळते. परंतु व्यावसायिक स्पर्धेतून ही आयव्हीएफ केंद्रे मुलांना जन्मास घालणार्‍या आधुनिक फॅक्टर्‍या बनल्या आहेत. त्यामुळे या केद्रांंकडून स्त्री बीजांची मागणी दिवसेंदिवस वाढत आहे. यासाठी या केंद्रचालक डॉक्टरांकडून महिला एजंट नेमण्यात आले आहे. आयव्हीएफ सेंटर हे कायदेशीर असले तरी त्यांना एका महिलेकडून एकदाच स्त्री बीज काढण्याची परवानगी आहे. परंतु बदलापूर येथील प्रकरणात एका महिलेकडून एकदा नाही तर दहा ते बारा वेळेस स्त्री बीज काढल्याचे उघड झाले आहे.

हा प्रकार बेकायदेशीर तर आहेच; शिवाय संबंधित महिलेसाठी जीवघेणादेखील आहे. स्त्री बीजासाठी या महिलांना अठरा ते पंचवीस हजार रुपये तर मध्यस्थी काम करणार्‍या महिलांना तीन हजार रुपये दिले जात असे. बारावी शिकलेल्या व स्वत:च सरोगेट मदर असलेल्या बदलापूर येथील सुलक्षणा गाडेकरच्या घरातून सर्वप्रथम या रॅकेटचा भांडाफोड झाला. या महिलेने घरामध्ये स्त्री बीज वाढवणारी इंजेशन्स बेकायदेशीरपणे साठवून ठेवली होती. बदलापूर उपजिल्हा रुग्णालयाच्या मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. ज्योत्स्ना सावंत यांना या प्रकरणाची माहिती मिळताच पथकासह त्यांनी छापा टाकला. या महिलेच्या मोबाईलमध्ये गर्भधारणेसाठी वापरल्या जाणार्‍या इंजेशन्सचे फोटो, सोनोग्राफीचे छायाचित्र, काही महिलांची बनावट नावाने तयार केलेली कागदपत्रे, सत्यप्रतिज्ञापत्रे तसेच आर्थिक व्यवहारांशी संबंधित माहिती आढळून आली आहे.

तामिळनाडू, कर्नाटक, गुजरात, केरळ या राज्यांमध्ये बनावट कागदपत्रे तयार करून या महिलांना पाठवले जात होते. अन्य राज्यांमार्फत ही स्त्री बीजे विदेशातही विक्री होत असल्याने आंतरराष्ट्रीय रॅकेट कार्यरत असल्याची शयता आहे. याचे मुख्य केंद्र बदलापूर नसून नाशिक शहरात असल्याचे आता सांगितले जात आहे. नाशिकमधील दंतरोगतज्ज्ञ डॉ. अमोल पाटील हे त्यांच्या स्त्रीरोगतज्ज्ञ पत्नीच्या नावाने मालती आयव्हीएफ सेंटर चालवत होते. ठाण्यातून ते हा अवैध व्यवसाय करत असल्याने बदलापूर गुन्हे शाखेने त्यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. या प्रकरणात उल्हासनगर येथील सोनोग्राफी सेंटर्स, कल्याणमधील मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह देखील सहभागी आहेत. यासाठी त्यांनाही कमिशन मिळत असे. पोलिसांनी आतापर्यंत विठ्ठलवाडी, अंबरनाथ आणि बदलापूर या तीन ठिकाणी छापे टाकून सुमारे आठ लाख रुपयांचे इंजेशन आणि विविध औषधसाठा जप्त केला आहे.

यातील एका एजंटकडून चार लाखांची दोनशे इंजेशन जप्त केली आहेत. महिलेचे रंग, रूप, वय याप्रमाणे त्यांना अधिक पैसे दिले जात असत. या प्रकरणानंतर बेकायदेशीररीत्या गर्भलिंग निदान व गर्भपात करणार्‍या बीड जिल्ह्यातील डॉ. सुदाम व सरस्वती मुंडे दाम्पत्याच्या मानवतेस काळिमा फासणार्‍या कृत्यांची आठवण जागी झाली आहे. याच बदलापुरात मागील वर्षी अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचाराने महाराष्ट्र हादरून गेला होता. यातील आरोपीचे एन्काऊंटर करण्यात आले असले तरी राजकीय आणि आर्थिक प्रभावशाली ठरलेले खरे सूत्रधार अद्याप मोकाट आहेत. बदलापूर पोलिसांपुढे आता अमोल पाटीलने उभारलेल्या या ‘ओव्हेरियन फार्मिंग’ची देशभरात पसरलेली पाळेमुळे खोदून काढण्याचे आव्हान आहे.

ताज्या बातम्या

संपादकीय : ७ सप्टेंबर २०२६ – उच्चस्तरीय समितीची कठीण ‘परीक्षा’

0
महाराष्ट्रातील शासकीय नोकरभरती परीक्षांमधील सातत्याने समोर येणारे गैरव्यवहार आणि पेपरफुटीचे सत्र थांबवण्यासाठी राज्य सरकारने सामान्य प्रशासन विभागाच्या (सेवा) अपर मुख्य सचिव व्ही. राधा यांच्या...