जगाने नुकताच जागतिक कॅन्सर दिवस साजरा केला. कॅन्सरचे प्रमाण वाढत आहे. तथापि प्रत्येक रुग्णाची व्याधीची तीव्रता, वेदना आणि अनुभव वेगवेगळे असू शकतात. या सगळ्याचा विचार उपचार पद्धतीत केला जावा हीच यावर्षीची या दिवसाची संकल्पना आहे. कॅन्सर ही दीर्घकालीन व्याधी आहे. त्याची लागण प्राथमिक टप्प्यात लक्षात आली तर रुग्ण कॅन्सरमुक्त होऊ शकतात. तथापि उशिराच लक्षात आले तर मृत्यूही संभवतो. कदाचित त्यामुळेच कॅन्सर झाल्याचे निदान होताच माणसे हबकतात. मनाने कोसळतात.
कॅन्सर आटोक्यात आणण्यासाठी आणि उपचार वेदनामुक्त व्हावेत यासाठी जगभर संशोधने आणि वेगवेगळे प्रयोग सुरू आहेत. उपचारांमध्ये भारतीय मसाल्यांचा उपयोग करण्याचे पेटंट भारतीय तंत्रज्ञान संस्था, चेन्नईच्या संशोधकांनी मिळवले आहे. वेगवेगळ्या लसी उपलब्ध होत आहेत. उपचारादरम्यान कराव्या लागणार्या चाचण्या कमीत कमी मूल्यात कशा होऊ शकतील यावरही मार्ग शोधले जात आहेत. तथापि कॅन्सरचे निदान झाल्यानंतर या गोष्टी रुग्णाच्या उपयोगी पडू शकतात. पण त्यासाठी आधी लोकांची प्राथमिक चाचणी आणि संशयितांच्या अधिक सखोल तपासण्या होणे गरजेचे आहे. त्यासाठी महाराष्ट्र सरकारने पुढाकार घेतला आहे.
आगामी महिनाभर जागरुकता, तपासणी आणि गरजूंवर योग्य ते उपचार अशी मोहीम राबवली जात आहे. त्यासाठी नाशिक जिल्ह्यात शीघ्र कृतिदल स्थापन करण्यात आल्याचे वृत्त माध्यमांत प्रसिद्ध झाले आहे. अनेकदा अनेक लोकांना लक्षणे जाणवतात. तरीही चाचण्या करणे टाळण्याकडेच अशा लोकांचा कल आढळतो. लोकांना कॅन्सरची प्रचंड भीती वाटते. ते स्वाभाविकही आहे. चाचणी केली आणि निदान झाले तर.. असे लोकांना वाटते. दुसरे कारण म्हणजे, चाचण्या खर्चिक असतात. केवळ लक्षणे दिसली किंवा संशय आला म्हणून त्या करून घेण्याइतकी सर्वांचीच आर्थिक परिस्थिती चांगली असू शकेल का? चाचणी आणि निदान झाले तर उपचारांसाठी प्रचंड खर्चाचा दबाव लोकांवर असू शकेल. ही चाचण्या टाळल्या जाण्याची दोन प्रमुख कारणे सांगितली जाऊ शकतील. उपरोक्त उल्लेखिलेला सरकारी पुढाकार ती उणीव काहीअंशी तरी दूर करणारा ठरू शकेल.
मोहीम विनाशुल्क असेल असे माध्यमातील वृत्तात म्हटले आहे. हा पुढाकार लोकांना चाचण्या करून घेण्यास प्रवृत्त करणारा आणि जागरुकता निर्माण करणारा ठरावा. गतवर्षी सरकारी पातळीवर महिलांची आरोग्य तपासणी करण्यात आली होती. त्याचे निष्कर्ष माध्यमांत प्रसिद्ध झाले होते. हजारो महिलांनी या मोफत तपासणीचा लाभ घेतला होता. परिणामी अनेक व्याधींचे निदान प्राथमिक पातळीवर शक्य होऊ शकले. उपरोक्त निर्णय जोरकस पद्धतीने अमलात आणला गेला तर तो लोकांना फायदेशीर ठरू शकेल. अन्यथा केवळ अमलबजावणीअभावी अनेक चांगले सरकारी निर्णय फाईलबंद होताना आढळतात. कॅन्सरसारख्या दीर्घ व्याधीच्या बाबतीतील लोकोपयोगी ठरू शकेल अशा निर्णयाचे असे होऊ नये इतकीच अपेक्षा.