Thursday, September 19, 2024
Homeअग्रलेखसंपादकीय : ६ सप्टेंबर २०२४ - एकीचे बळ

संपादकीय : ६ सप्टेंबर २०२४ – एकीचे बळ

सार्वजनिक अस्वच्छता ही गंभीर समस्या आहे. कचरा कुठेही टाकण्याच्या बेपर्वा सवयीमुळे रस्त्यांवर अनेक ठिकाणी कचर्‍याच्या जागा निर्माण होतात. प्लास्टिकच्या पिशव्यांचा थर साचतो. त्यामुळे परिसरात दुर्गंधी तर निर्माण होतेच पण साथीच्या आजारांचा धोकाही बळावतो.

- Advertisement -

प्रशासकीय यंत्रणेतील संबंधित विभागाने कचर्‍याचे ढिगारे साफ करावेत, अशी मागणी लोक सातत्याने करतात. तक्रारीदेखील दाखल करतात. म्हणजे एका अर्थाने लोकांच्या बेजबाबदार वर्तनाचे ओझे प्रशासकीय यंत्रणेच्या खांद्यावर असे म्हटले तर ते वावगे ठरू शकेल का? तथापि लोक एकत्र आले आणि त्यांनी पुढाकार घेतला तर सार्वजनिक जागा स्वच्छ होऊ शकतात हे काही नागरिकांनी त्यांच्या कृतीतून दाखवले. नाशिकच्या कर्मयोगीनगर, तिडकेनगर आणि कालिका पार्क परिसरात काही मोकळे भूखंड आणि उद्यान आहे. तिथे प्रचंड कचरा साचला होता. तो साफ करण्यासाठी परिसरातील नागरिक एकत्र आले.

मोहिमेचे नियोजन केले आणि मोकळे भूखंड आणि उद्यान कचरामुक्त केले. त्यांनी सुमारे दीड टन कचरा संकलित केला. म्हणजे तितका कचरा तिथे टाकला गेला होता. उद्यानात त्यांनी औषधी वृक्षांची लागवडदेखील केली. त्याचे सविस्तर वृत्त माध्यमांत प्रसिद्ध झाले आहे. परिसरात अनेक मोकळे भूखंड असतात. स्थानिक स्वराज्य संस्थेने उद्याने आणि समाजमंदिरे बांधलेली असतात. ग्रामीण भागही त्याला फारसा अपवाद आढळत नाही. शहरांच्या तुलनेत तेथील अशा जागांची संख्या कमी असते इतकेच.

जागा कुठल्याही असोत त्यांच्या देखरेखीची व्यवस्था नेहमीच वादाच्या भोवर्‍यात सापडताना आढळते. उद्याने, मोकळ्या जागा, सभागृहांचा परिसर आणि क्वचित समाजमंदिरे अस्वच्छ असून रात्री ते गुंडांचे आश्रयस्थान बनतात, अशा तक्रारी नागरिक करतात. प्रशासन त्याची दखल घेईल याची प्रतीक्षा करतात. ते गैर नाही. सार्वजनिक स्वच्छता राखणे हे प्रशासनाचे कर्तव्य आहे. तथापि दखल घेतली जात नाही तोपर्यंत गैरसोय सहन करतानाही अनेक जण आढळतात. तथापि गैरसोय सहन करण्यापेक्षा त्यावर उत्तर शोधण्याचा मार्ग उपरोक्त परिसरातील ज्येष्ठांनी दाखवला आहे.

हातावर हात धरून बसून समस्या सुटत नाही. प्रत्यक्ष सहभाग आणि कृती समस्यांवर उत्तरे शोधू शकते हे त्या लोकांनी स्वप्रयोगातून सिद्ध केले. एकीला नेहमीच बळ असते. परिसरात महिला आणि ज्येष्ठ नागरिक एकत्र आले तर परिसर स्वच्छ राहू शकेल. गुंड प्रवृत्तीवर वचक राहू शकेल.

- Advertisment -

ताज्या बातम्या