‘कुणाच्या खांद्यावर, कुणाचे ओझे…?’ या ओळींची अनुभूती पंढरीच्या पांडुरंगाला दरवर्षीप्रमाणे यंदाही घेतली. राज्याच्या कल्याणाचे ओझे विठूरायाच्या खांद्यावर टाकून सत्तेतील कारभारी मंडळी राजकारणाचा सारीपाट पुन्हा खेळायला मोकळी झाली. सत्ता कोणाचीही असो, विठ्ठलासोबत दरवर्षी हेच घडते. पाऊस त्यानेच पाडायचा, पीकपाणी त्यानेच पिकवायचे, बळीराजाला सुखी त्यानेच करायचे, महागाई त्यानेच कमी करायची, तर मग हे सर्व करण्याची जबाबदारी ज्यांच्या खांद्यावर आहे, त्यांनी काय करायचे? हा प्रश्न देवालाही पडेल.
कारण राजकारणी इतके चाणाक्ष आहेत की, ते विठ्ठलाला नेहमीच गृहीत धरतात. मोसमी पाऊस ही निसर्गाची किमया आहे. अर्थात तोही आता लहरी झाला आहे, पण त्याच्या लहरीनुसार बळीराजा शेती पिकवण्याचा प्रयत्न करतो. महागाई मदिन दुगणी; रात चौगुणीफ अशी वाढत आहे. बेरोजगारी कमी होत नाही. शिक्षण आणि वैद्यकीय उपचार सामान्यांच्या आवाक्याबाहेर चालले आहेत. रस्ते खड्ड्यात जातात. पावसात शहरे तुंबतात. विजेचा खेळखंडोबा अखंड सुरु असतो. झाडे पडतात. या गोष्टींबद्दलही राजकारणी पावसालाच जबाबदार धरतात.
कमी वेळेत जास्त पाऊस झाला, असे कारण सांगितले जाते. त्यांची तरी काय चूक म्हणा! जनतेची कामे करण्यासाठी आपल्या कामांतून वेगळा वेळ काढावा लागतो. तो कोणाकडे आहे? आघाड्यांचे राजकारण, सत्तेसाठी लांड्या-लबाडया, एकमेकांचे पाय खेचणे, वार-पलटवार, हौशे-नवशे सांभाळणे ही कामे सोपी का आहेत? चौकोनी कुटुंब चालवता-चालवता माणसे मेटाकुटीला येतात. राजकारण्यांना तर पक्ष पोसायचा असतो. हे काम येरागबाळाचे नाही. त्यासाठी वेळ द्यावा लागतो. खिसे रिकामे करावे लागतात. इध्या सगळ्या व्यापातून त्यांनी जनतेसाठी वेळ तरी कसा काढावा? दिवसाचे तास अट्ठेचाळीस करणे त्यांना शक्य नाही म्हणून बरे; अन्यथा त्यांनी तीही करामत करून दाखवली असती.
म्हणूनच आपल्यावरचे हे सगळे ओझे सत्तेतील नेते विठ्ठलाच्या चरणी अर्पण करीत असावेत. तसेही देव भावाचा भुकेला असतो. त्यामुळे आषाढी-कार्तिकीला देव राऊळाऐवजी वारकर्यांना उरा-उरी भेटण्यासाठी चंद्रभागेच्या वाळवंटी धाव घेतो, अशी वारकर्यांची श्रद्धा आहे. वारकरी देवाला ‘माऊली’ मानतात. त्याच्या पायी डोके टेकवण्यासाठी शेकडो किलोमीटरची पायपीट करतात. ऊन-वारा-पाऊस सहन करतात. ते कधीच देवाकडे कधी काही मागत नाहीत. या उलट राजकारण्यांचे! ते देवाकडे बिनदिक्कत मागणे मागतात आणि आपल्या खांद्यावरील जबाबदारीचा भर त्याच्यावर टाकून मोकळे होतात.




