Thursday, September 19, 2024
Homeअग्रलेखसंपादकीय : ७ सप्टेंबर २०२४ - मुकी बिचारी कुणीही हाका

संपादकीय : ७ सप्टेंबर २०२४ – मुकी बिचारी कुणीही हाका

खड्डेमय रस्त्यांना राज्यातील नागरिक चांगलेच वैतागले आहेत. कल्याणच्या लोकप्रतिनिधींनी तर प्रशासनाशी थेट दोन हात करण्याचा इशारा दिल्याचे वृत्त माध्यमांत प्रसिद्ध झाले आहे. त्यातील वादाचा राजकारणाचा विषय क्षणभर बाजूला ठेवला तरी त्यांनी नागरिकांच्या संतप्त भावनांना वाचा फोडली, असे म्हणणे संयुक्तिक ठरू शकेल.

- Advertisement -

नाशिक-मुंबई रस्त्याच्या दुरवस्थेवरून उद्योजकांनी आंदोलनाचा इशारा दिला होता. तेव्हा तातडीने तो रस्ता दुरुस्तीचे आश्वासन सरकारने दिले होते. पण ते अळवावरचे पाणीच ठरले आहे. रस्ता अधिकाधिक खराब होत असून प्रवासासाठी लागणारा वेळ वाढत आहे. शहरांतर्गत रस्त्यांच्या अवस्थेवरून नाशिकच्या लोकप्रतिनिधींनी आयुक्तांना घेराव घातला. संबंधित अधिकार्‍यांनी रस्त्यावर उतरून समस्येची दखल घेण्याचे आश्वासन दिले होते. ते अद्याप तरी अमलात आणले गेले नसल्याचे वृत्त माध्यमांत प्रसिद्ध झाले आहे.

मागील पाच वर्षांत शहरांतर्गत रस्त्यांवर सुमारे साडेबाराशे कोटी रुपये खर्च केल्याचे सांगितले जाते. राज्यातील अन्य शहरांमधील परिस्थिती यापेक्षा वेगळी नसावी. म्हणजे आंदोलन केले, घेराव घातला, रास्ता रोकोचा इशारा दिला तरी संबंधितांच्या तोंडाला पाने पुसण्याव्यतिरिक्त काहीच घडत नाही, असाच याचा अर्थ असू शकेल का? दर्जेदार रस्ते बांधणे हे प्रशासकीय यंत्रणेचे काम आहे. ते कर्तव्यही पार पाडायचे नाही आणि लोकांच्या आंदोलनाची दखलही घ्यायची नाही, असा यंत्रणेचा खाक्या असावा.

खराब रस्त्यांचे दुष्परिणाम माणसांना आणि वाहनांना सहन करावे लागतात. माणसांना हाडाची दुखणी जडतात. वाहने भंगारात निघतात. वाहतूक जाम होते. वेळ वाढतो. हॉर्न जोरजोरात वाजतात. इंधनाचा धूर होतो. प्रदूषण बळावते. परिणामी श्वसनाचे विकार जडतात. अनेकांना तात्पुरते बहिरेपण येण्याचा धोका वाढतो. म्हणजे खड्डेमय रस्त्यांचे जे बळी ठरतात त्यांचे आंदोलनदेखील यंत्रणा गंभीरपणे घेत नसावी. लोक त्यांची तक्रार त्यांच्या प्रतिनिधींकडे मांडतात. लोकप्रतिनिधी आंदोलन करतात पण त्यामुळे यंत्रणा प्रभावित झाल्याचा लोकांचा अनुभव नाही.

उपरोक्त दोन उदाहरणे त्याचे चपखल उदाहरण म्हटले जाऊ शकेल. रस्ते दर्जेदार बांधले जाऊ शकतात हे अनेक खासगी कंपन्यांनी सिद्ध केले आहे. मग सरकारी यंत्रणांनी बांधलेले रस्तेच खड्ड्यात का आणि कसे जातात? हे कोडे लोकांना अजूनही उलगडलेले नाही. रस्ता बांधला आणि किमान काही वर्षे ते वापरात आल्यावर खराब झाला असे घडणे म्हणजे चमत्कार मानला जाऊ शकेल, अशी रस्त्यांची सद्यस्थिती आहे. लोकांची मात्र मुकी बिचारी कुणीही हाका अशी अवस्था आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या