झोपेच्या आरोग्याला प्राधान्य द्या, ही यावर्षीच्या जगातील झोप दिवसाची संकल्पना होती. नेमकी तीच गोष्ट आणि त्यामुळे माणसाचे सर्वांगीण मानसिक आणि शारीरिक आरोग्य कमालीचे धोक्यात येण्याची शक्यता बळावत आहे. शांत, निवांत झोपेचे चक्र इतके बिघडत चालले आहे की त्यावर जागरुकता निर्माण करण्यासाठी जागतिक झोप दिवस साजरा करण्याची प्रथा जगाला सुरू करावी लागली. देशातील प्रमुख पाच शहरांमध्ये पन्नास टक्के लोकांना झोपेची समस्या जाणवते असा निष्कर्ष एका सर्वेक्षणाने नुकताच नोंदवल्याचे वृत्त माध्यमांत प्रसिद्ध झाले आहे.
याच समस्येने बहुसंख्य माणसेही हैराण असतील. अनिद्रा किंवा निद्रानाश यावर उपचार घेणार्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याचे मानसोपचारतज्ज्ञांचेही निरीक्षण आहे. माणसाच्या एकूणच मानसिक आणि शारीरिक आरोग्यासाठी शांत आणि गाढ झोप अत्यावश्यक मानली जाते. अशा झोपेला डॉक्टर आणि योगगुरू आरोग्यासाठीच औषधदेखील मानतात. अशी झोप होणार्या माणसाला एकदम ताजेतवाने वाटते. त्याचा उत्साह वाढतो यावर सामान्य माणसांचेदेखील एकमत होईल.
गाढ झोप व मेंदूचे आरोग्य याचा संबंध उलगडून सांगणारा मजकूर, तज्ज्ञांचे लेख आणि सल्ले माध्यमात सातत्याने प्रसिद्ध होतात. ही झोप कुठे हरवते? रोजच्या जगण्यातील सगळ्या प्रकारचे ताणतणाव, अयोग्य आहार-विहार आणि व्यसने तर त्याचे कारण आहेतच पण सद्यस्थितीत मोबाईलचे व्यसन हा झोपेचे चक्र बिघडवणारा प्रमुख घटक मानला जातो.
माणसे उशिरापर्यंत प्रत्यक्ष ऑनलाईन आणि नंतर झोपले तरी मनाने ऑनलाईन राहू शकतात. अशी सगळ्या प्रकारची बेशिस्त झोपेची वाट लावते. ही स्थिती अनारोग्यासाठी रेड कार्पेट ठरते. चिडचिड, नैराश्य, स्मरणशक्ती कमी होणे, स्थूलता वाढणे, मधुमेह-उच्च रक्तदाबाचा धोका अशा अनेक भेटी अशांत झोप तिच्या बरोबरीने आणते. शांत झोपेला औषध किंवा उत्साहाचे टॉनिक का मानतात ते यावरून लक्षात येऊ शकेल. अनिद्रेचा त्रास असणार्या सर्वांचाच औषधांची गरज पडते असे नाही. शांत आणि गाढ झोपेसाठी तज्ज्ञ खूप सोपे सोपे उपाय सुचवतात.
जे अमलात आणले जाऊ शकतील. बुद्धिमत्ता, विचार क्षमता आणि तर्कशक्ती माणसाला प्राणिसृष्टीपेक्षा वेगळे ठरवते. म्हणजेच माणूस विचार करू शकतो. तर्क लावू शकतो. एखाद्या गोष्टीमागचा कार्यकारणभाव जाणून घेऊ शकतो. याच गुणांचा वापर त्याने अशांत झोपेची कारणे शोधण्यासाठी करण्याची गरज आहे. त्याच्या आधारे स्वतःचे झोपेचे चक्र का बिघडले हे त्याच्या लक्षात येऊ शकेल. समस्येची कारणे समजून घेतली तर उपाययोजना करणे सोपे जाऊ शकेल.