Tuesday, March 25, 2025
Homeअग्रलेखसंपादकीय : ८ फेब्रुवारी २०२५ - गोदेची आर्त हाक ऐकू येईल का?

संपादकीय : ८ फेब्रुवारी २०२५ – गोदेची आर्त हाक ऐकू येईल का?

नाशिककरांनी गोदावरीचा जन्म नुकताच साजरा केला. त्यानिमित्त गोदावरीचे महात्म्य आणि नाशिकच्या विकासातील तिचे योगदान चर्चिले जात आहे. अनेक पुराणांमध्ये तिची थोरवी वर्णिली गेल्याचे आढळते. अशा नदीचा जन्मोत्सव साजरा केला जायलाच हवा. त्यानिमित्त नदीच्या उपकारातून उतराई होण्याची आणि तिच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याची संधी माणसांना मिळते. तथापि तिच्या उपकारातून माणसांना खरेच उतराई व्हायचे असेल तर तिचे मूळचे निर्मळ स्वरूप कायम राखण्याचा संकल्प माणसे करू शकतील.

सध्याचे तिच्या पात्राचे स्वरूप कोणाही संवेदनशील माणसाला अस्वस्थ करणारे ठरू शकेल. तिचे ठिकठिकाणचे पात्र पाणवेली गिळंकृत करतात. तिच्या पात्रात गटारी सोडलेल्या आढळतात. अनेक ठिकाणी तिच्या पाण्यातील प्राणवायूची पातळी शुन्यावर आल्याचे सांगितले जाते. शहराच्या थोडे बाहेर गेले तर गोदेच्या पात्रातून पाणी वाहते की फेस असा प्रश्न कोणालाही पडू शकेल. तिच्या शुद्धीकरणाची मुख्य जबाबदारी शासनाची आहे. पण म्हणजे नेमकी कोणाची हे राज्याच्या जलसंपदामंत्र्यांनी नुकतेच माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले. निधी देणे हे केंद्र आणि राज्य सरकारचे काम आहे. पण त्यासाठीच्या योजना प्रत्यक्ष अमलात आणणे ही नाशिक महानगरपालिकेची जबाबदारी आहे, असे त्यांनी सांगितले.

- Advertisement -

आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर गोदेचे पात्र प्रदूषणमुक्त आणि बारमाही वाहते करण्यावर भर दिला जाईल का? तिच्या पात्रातील काँक्रिटीकरण काढले जाईल, पूररेषेतील बांधकामे काढली जातील, सांडपाणी प्रक्रिया केंद्रांची संख्या वाढवली जाईल का? कुंभमेळ्याच्या निमित्ताने त्यासाठीची राजकीय आणि प्रशासकीय इच्छाशक्ती दाखवली जाईल, अशी नाशिककरांची अपेक्षा आहे. जलसंपदामंत्र्यांनी लोकांनादेखील त्यांच्या कर्तव्याची आठवण करून दिली आहे. गोदेचे पात्र प्रदूषित होण्यात लोकांचाही मोठाच हातभार लागतो.

निर्माल्य, कचरा टाकण्याची, कपडे आणि वाहने धुण्याची, भाज्या धुण्याची नदी लोकांना हक्काची जागा वाटते. परिणामी पाण्याला दुर्गंधी येते. गोदावरीचे पौराणिक महात्म्य अगाध आहे. त्याचा लाभ घेण्यासाठी असंख्य पर्यटक येतात. तथापि त्यांना तिच्या काठाशी दुर्गंधीचा अनुभव येतो. लोकांनी ठरवले तरच नदीचा सन्मान राखला जाऊ शकेल. गोदेचा जन्म साजरा करत असताना तिच्या पाण्याचे प्रदूषण करणार्‍या सवयी बदलाचा निश्चय माणसे करू शकतील. सामान्यांनी त्या सवयी बदलल्या तर पात्र किमान स्वच्छ तरी राहू शकेल. गोदेला जीवनदायिनी म्हटले जाते. तीच नदी यंत्रणा आणि माणसांच्या नाकर्तेपणामुळे मृतवस्थेला गेली तर.. नुसता विचारदेखील नाशिककरांच्या अंगावर काटा आणणारा ठरावा. गोदेची आर्त हाक सर्वांना ऐकू येईल का?

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Sanjay Raut : “२०१४ मध्ये युती तोडण्यास…”; राऊतांनी फडणवीसांची बाजू घेत...

0
नाशिक | Nashik महाराष्ट्राच्या राजकारणात (Maharashtra Politics) मागील दशकभरात अनेक मोठ्या घडामोडी घडल्या आहेत. दोन दशकांहून अधिक काळ सोबती असलेल्या भाजप आणि शिवसेना (BJP and...