टी-ट्वेन्टी विश्वचषक विजेत्या भारतीय संघाचे मुंबईकरांनी मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात केलेले स्वागत चांगलेच चर्चेत आहे. भारतीय संघाच्या स्वागत यात्रेचे कवित्व अजून काही दिवस सुरुच राहील. मरिन ड्राइव्हवर लाखो क्रिकेटप्रेमींचा उसळलेला सागर, त्या गर्दीतून वाट काढत पुढे चाललेली भारतीय संघाची बस, दिल्या जाणार्या जोशपूर्ण घोषणा यांच्या चित्रफितींचा सध्या भलताच धुमाकूळ सुरु आहे.
या गर्दीत एक रुग्णवाहिका अडकली होती. गर्दीला डोके नसते, असे म्हटले जाते. मात्र त्या गर्दीतही माणसांची डोकी बहुदा शाबूत होती. त्यामुळे गर्दीत अडकलेल्या त्या रुग्णवाहिकेला क्रिकेटप्रेमींनी मोठ्या मनाने वाट मोकळी करून दिली. जल्लोशातही माणुसकी न विसरणार्या क्रिकेटप्रेमींचे भरभरून कौतुक होत आहे. माणुसकी हरवत चालली असे नेहमीच बोलले जाते. त्याच्या पुष्ट्यर्थ उदाहरणेही दिली जातात. तथापि समाजाची मानसिकता अजून इतकी खालावलेली नाही, हेच त्या गर्दीने त्या दिवशी दाखवून दिले. लोकांचा स्वयंस्फूर्त पुढाकार स्वागतार्ह आहे, पण अन्य वेळी सामाजिक भान राखण्यात समाजाची मानसिकता कमी का पडत असावी? स्वागताच्या दिवशी मरीन ड्राइव्ह परिसरात प्रचंड कचरा साठला होता. चपला-बूट आणि पाण्याच्या बाटल्यांचा खच पडला होता.
दुसर्या दिवशी मुंबई महापालिकेला तेथे स्वच्छता मोहीम राबवावी लागली. दोन डंपर आणि पाच जीप भरून कचरा संकलित करण्यात आला. सुमारे आठ तासांपेक्षा जास्त काळ स्वच्छता मोहीम सुरु होती, असे वृत्तपत्रांत प्रसिद्ध झालेल्या बातम्यांत म्हटले आहे. स्वच्छतेबाबतचा हा बेपर्वा दृष्टिकोन अनेक ठिकाणी अनुभवास लोक आपापली घरे, अंगणे झाडून स्वच्छ ठेवतात. मात्र घराची स्वच्छता करणार्या माणसांकडून त्यांचाच परिसर अस्वच्छ करण्यात कळत-नकळत हातभारही लागतो. ठिकठिकाणी कचर्याचे ढीग साठतात.
परिसरातील तलाव आणि नद्या म्हणजे माणसांना कचरा फेकण्याचे हक्काचे ठिकाण वाटते. माणसे जिथे जातील तिथे कचरा निर्माण करतात. अगदी माउंट एव्हरेस्ट शिखरदेखील त्याला अपवाद राहिलेले नाही. सर्वोच्च शिखर असलेले एव्हरेस्टच सर करणे हेच मोठे आव्हान असते. तेथेही माणसांनी केलेला कचरा चिंतेचा विषय ठरतो. वाट्टेल तिथे थुंकण्याची अनेक माणसांना सवय असते. ‘रांगेचा फायदा सर्वांना’ ही उक्ती फक्त फलकापुरती मर्यादित राहिली आहे. सार्वजनिक समारंभात मोठ्या प्रमाणावर अन्न वाया घालवले जाते. घटनेने माणसांना जसे हक्क बहाल केले आहेत; काही कर्तव्येदेखील सांगितली आहेत. हक्कांसाठी माणसे संघटना स्थापन करतात. लढतात. मोर्चे काढतात. आंदोलने करतात. त्याचवेळी कर्तव्ये आणि जबाबदार्यांचा त्यांना विसर का पडत असावा?