दिवाळीच्या दिवसांत स्थानिक यंत्रणेने शहर परिसरातून सुमारे बारा हजार टन कचरा संकलित केल्याचे वृत्त माध्यमांत प्रसिद्ध झाले आहे. एरवीही कचरा संकलनाची प्रक्रिया सुरूच असते. तथापि दिवाळीच्या काळात त्यात दरदिवशी सुमारे दीडशे टन अतिरिक्त कचर्याची भर पडत होती असे त्यात म्हटले आहे. दिवाळीच्या दिवसांत घरादाराची अट्टाहासाने स्वच्छता करणारी माणसे परिसर स्वच्छतेबाबत बेफिकीर का असावीत? वाढत्या संपन्नतेबरोबरीने वाढत्या अपेक्षा आणि बेफिकिरी माणसांच्या मनात शिरली असावी का? सृष्टीला, निसर्गाला गृहीत धरण्याची वृत्ती वाढत असावी का? काळाच्या ओघात माणसाने अनेक बदल सहज स्वीकारले.
वेष्टनात गुंडाळलेल्या छोट्या छोट्या गोष्टी माणसांना घरबसल्या त्यांच्या हाताशी मिळू लागल्या. प्लास्टिकचा शोध आणि त्याच्या वाढत्या वापरामुळे माणसाच्या दैनंदिन आयुष्यात अनेक गोष्टी सोप्या केल्या. प्लास्टिकचा वापर जणू अपरिहार्य बनला. पूर्वी बदल म्हणून माणसे बाहेर जेवायला जात असत. नंतरच्या काळात ती अनेकांची सवय बनली. आधुनिक तंत्रज्ञानाच्या जगात असे बदल अपरिहार्य मानले जातात. तथापि बळावलेल्या बेफिकिरीमुळे त्यातूनही माणसे कचरा वाढवतात, ही खरी समस्या आहे. माणसे अन्न सर्रास टाकून देतात. प्लास्टिकच्या कचर्याचा भस्मासूर माणसाच्याच डोक्यावर हात ठेवण्याचा धोका आहे.
वर्षभराचे धान्य साठवण्याची पद्धती अनेक घरांमध्ये आजही आढळते. त्याला कीड लागू नये म्हणून रसायनांचा वापर केला जातो. त्याचीही मुदत असते. मुदत संपलेली अशी औषधे आणि रसायने कशी फेकावीत हे किती जणांना माहीत असू शकेल? ओला आणि सुका कचरा वेगवेगळा करून घंटागाडीत टाकावा यासाठी स्थानिक प्रशासन जनजागृती करते. तेही माणसे करत नाहीत. तात्पर्य, माणसे निर्माण करत असलेल्या कचर्याचे व्यवस्थापन ही गंभीर समस्या आहे. त्याचा भार सृष्टीला पेलवेना झाला आहे. जमीन नापीक होण्याचे, जलस्रोत प्रदूषित होण्याचे ते एक प्रमुख कारण मानले जाते. कचरा निर्माण होणारच नाही किंवा तो कचरा निर्माण करू नका असे शक्य नाही.
वाढत्या लोकसंख्येबरोबर कचर्यातही वाढ होत जाईल, हेही अपेक्षित आहे. तथापि व्यक्तिगत आणि सामाजिक पातळीवर याबाबतीत सामाजिक भान रुजण्याची आवश्यकता आहे. कचर्याचे व्यवस्थापन ही प्रशासकीय यंत्रणेची जबाबदारी आहे. तथापि सवयींमधील छोटे छोटे बदल त्याला हातभार लावू शकतील. कचरा योग्य ठिकाणी आणि योग्य पद्धतीने फेकणे, ओला आणि सुका कचरा वेगवेगळा करून टाकणे, प्लास्टिकचा शक्य असेल तेवढा वापर कमी करणे, एकदा वापरून फेकून दिले जाणारे प्लास्टिक अजिबात न वापरणे, अन्न वाया न घालवणे, मुदत संपलेल्या औषधांच्या विल्हेवाटीची प्रक्रिया समजून घेणे हे त्यापैकी काही बदल. ज्यांचा स्वीकार माणसाला सहज शक्य आहे.