अल्पवयीन मुलांनी वाहन चालवणे हा दखलपात्र सामाजिक मुद्दा बनला आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यांत अल्पवयीन वाहनचालकांच्या पालकांवर पोलीस अधून-मधून कारवाई करतात. गडचिरोली शहरात पोलिसांनी तीसपेक्षा जास्त पालकांवर नुकतेच गुन्हे दाखल केले आहेत. अल्पवयीन मुलांनी वाहन चालवणे हा कायद्याने गुन्हा ठरवला गेला आहे. असा गुन्हा सिद्ध झाल्यास पंचवीस हजारांचा दंड, पालकांना तीन वर्षांचा तुरुंगवास आणि वाहन परवाना रद्द करण्यासह इतर कलमांचा त्यात समावेश आहे.
तथापि कोणतेही नियम न पाळण्याची वृत्ती लोकांच्या इतकी अंगी भिनली आहे की, अल्पवयीन मुलांनी वाहन चालवू नये, असा काही नियम आहे याबद्दल बहुतेक पालकांना माहिती असण्याची शक्यता कमी असेल. अल्पवयीन मुलांनी वाहन चालवणे हे रस्ते अपघातांचे एक कारण मानले जाते. सुरक्षित वाहन चालवण्याची कौशल्ये अल्पवयीन मुलांजवळ कशी येणार? वाहने अतिवेगात चालवणे, वाहनांच्या गर्दीतून घाईने मार्ग काढणे, वाहन चालवताना मोबाईलवर बोलणे, असे प्रकार अनेकदा घडतात. त्याला आळा घालण्यासाठी कायदे आहेत. त्यांची सातत्याने कठोर अंमलबजावणी व्हायला हवी.
तथापि अल्पवयीनांनी वाहन चालवण्याबाबत कायदा पालकांना दोषी का मानतो? याचा विचार पालकांनी करायला हवा. कारण पालकच विविध कारणांनी मुलांच्या हाती वाहन सोपवतात. अनेक जण त्याचे समर्थनही करतात. लहान वयात आपली मुले वाहन चालवतात याचे अनेक पालकांना भारी कौतुक असते. पालकांचे हेच वर्तन मुलांना वाहन चालवण्यास प्रेरित करते. ही बाब किती पालकांच्या लक्षात येते? अल्पवयीन मुलांना वाहन चालवण्यास पालकांनी ठाम नकार दिला पाहिजे. लहान मुलांच्या हाती वाहन देण्यामागे त्यांच्या व्यस्त वेळापत्रकाचे कारण पुढे केले जाते. ते खरे असेलही, पण त्याऐवजी मुलांना पालकांनी पर्याय द्यायला हवा. योग्य वयात वाहन सोपवताना सुरक्षित वाहन चालवण्याचे किमान ज्ञान त्यांनी आपल्या पाल्यांना द्यायला हवे.
कायदे व नियम, त्यांचे पालन, न पाळल्यास अपघातांची शक्यता, मुलांच्या व रस्त्यावरील इतरांच्याही जीवाची जोखीम आदींबाबत मुलांमध्ये जागरूकता निर्माण करणे हे पालकांचे कर्तव्य आहे. सोळा ते अठरा वयोगटातील मुलांसमोर कायदेपालनाचा आदर्श पालकांनी उभा करावा. पालकच नियम आणि कायदे धाब्यावर बसवणार असतील तर त्यांना जबाबदारीची जाणीव करून देणे आवश्यक आहे. अल्पवयीन मुलांच्या हाती वाहन देणार्या काही पालकांवर कायदेशीर कारवाई झाली असेल तर त्यामुळे इतर पालक तरी सावध होतील.





