भीमाशंकर ते कळसुबाई परिसरात सुमारे शंभर देवराया आहेत. त्यांचे संरक्षण आणि संवर्धन करण्याचा निर्णय राज्याच्या वनविभागाने घेतला आहे. देवरायांचे क्षेत्र व क्षेत्रफळ निश्चित करणे, जैविविधतेचे मूल्यांकन, त्यातील प्राण्यांच्या जाती व संख्या असे देवरायांचे समग्र दस्तऐवजीकरण करणे अशी अनेक उद्दिष्टे वनखात्याने जाहीर केली आहेत. जे अत्यंत गरजेचे आहे.
एखाद्या गोष्टीची शास्त्रोक्त नोंदच नसेल तर ती गोष्ट नष्ट झालेली लक्षात कशी येणार? हेच तत्त्व देवरायांना देखील लागू आहे. देवराया म्हणजे देवाच्या नावाने राखलेले रान अशी ढोबळ व्याख्या केली जाते. त्यामुळे तिथे कोणत्याही प्रकारची तोड केली जात नाही. लोक ते रान राखतात. देवरायांचे अशा पद्धतीने वर्षानुवर्षे संवर्धन केले जात असल्याने त्यांची एक परिसंस्थाच विकसित होते. तिथली जैविविधता संपन्न असते. दुर्मीळ वृक्ष, औषधी वनस्पती, वेली, प्राणी, पक्षी, कीटक तिथे सुखनैव नांदतात. पाण्याचे जिवंत स्रोत असतात. देवरायात मानवाचा वावर अत्यंत मर्यादित आढळतो. अनेकार्थाने देवराया पर्यावरण रक्षणात महत्वाची भूमिका बजावतात.
डॉ. माधवराव गाडगीळ यांनी देवरायांचा शास्त्रोक्त अभ्यास आणि संशोधन केले आहे. तेही पर्यावरण रक्षण आणि संवर्धन यातील देवरायांची भूमिका नेहमीच विशद करतात. बहुसंख्य देवरायांना प्राचीन इतिहास असतो. त्या राखल्या जाणे मानवाच्याच हिताचे आहे. पूर्वी अनेक मंदिरांच्या अवतीभवती दाट वृक्षराजी आढळायची. ती आता अभावाने आढळते. देवराया विकसित होण्यात जसा लोकांचा सहभाग असतो तद्वतच त्या नष्ट होण्यास लोकांचे दुर्लक्ष कारणीभूत ठरते. त्याअर्थाने लोकजागरुकता महत्वाची आहे.
देवरायांशी युवा पिढी जोडली जाण्यासाठी ‘वारसा फेरी’ आयोजित करता येऊ शकेल. देवरायांची माहिती, महत्त्व आणि जंगल राखणे मानवासाठी फायद्याचेच ठरते हे त्यांच्या मनावर ठसवले जाऊ शकेल. देवराया राखल्या गेल्या तर लोकं नियमितपणे तिथे भेटी देऊ शकतील. तथापि प्रत्येक गावाला देवराईचा वारसा असेल असे नव्हे. पण लोकांची इच्छाशक्ती असेल तर नव्यानेही देवराया विकसित केल्या जाऊ शकतील. तिथे देशी झाडांच्या प्रजातींची लागवड करून त्यांची राखण केली जाऊ शकेल.
नाशिकमध्ये अशी एक देवराई लोकसहभागातून सातत्याने विकसित होत आहे आणि राखली जात आहे. मानवाकडून नैसर्गिक साधनसंपत्तीचे दोहन सुरूच असते. त्याचे दुष्परिणाम लोक जाणून आहेत. त्यांना ते सहनही करावे लागतात. त्यामुळेच फक्त देवरायाच नव्हे तर देशी झाडांची लागवड, त्यांची राखणदारी, त्यांच्या त्यांच्या परिसरातील वृक्षराजीची गणना अशा अनेक गोष्टी करणे माणसांचे कर्तव्य आहे. त्या माध्यमातून देवरायांचे पांग फेडणे ही जबाबदारी आहे. वनखात्याला देखील तेच सुचवायचे असावे?