हवामान बदलाचे ओझे दिवसेंदिवस वसुंधरेला पर्यायाने मानवाला पेलवेनासे झाले आहे. ऑक्टोबर महिना नुकताच संपला. हा महिना यावर्षीचा सर्वात उष्ण महिना होता, असे भारतीय हवामान खात्याने नुकतेच जाहीर केले. 1901 नंतर पहिल्यांदाच या महिन्याने उष्णतेचा विक्रम नोंदवला, असेही खात्याने म्हटले आहे.
वास्तविक ऑक्टोबर महिन्यापासूनच थंडीची चाहूल लागते, असे मानले जाते. पण यावर्षी नोव्हेंबर महिन्याचा पहिला आठवडा उलटत आला तरी उन्हाचे चटके बसत आहेत. थंडीचे आगमन लांबणार असून अजून साधारण दहा-बारा दिवस वातावरणात उष्मा राहील आणि अवकाळी पावसाचा मुक्काम काहीकाळ लांबेल, असाही हवामान खात्याचा अंदाज माध्यमांत प्रसिद्ध झाला आहे.
काही दशकांपूर्वी तीन ऋतूंचे महिने कोणकोणते असा प्रश्न विद्यार्थ्यांना विचारला तर त्याचे उत्तर त्वरित दिले जायचे. कारण तसे ऋतू त्यांच्या अनुभवासदेखील यायचे. तथापि हाच प्रश्न सध्याच्या विद्यार्थ्यांना विचारला तर त्यांचा नक्कीच गोंधळ होऊ शकेल. कारण कधी कधी ते एकाच दिवसात हे तीनही ऋतू अनुभवताना आढळतात. पहाटे थंडी, दुपारी ऊन आणि रात्री पाऊस पडतो.
ऋतूंची इतकी सरमिसळ समाज अनुभवतो. कोणत्याही ऋतूला कोणताही आराखडा राहिलेला नाही. परिणामी निसर्गाचे, शेतीचे, मानवी आरोग्याचे वेळापत्रकच बिघडले आहे. त्याचे परिणाम सामान्य माणसे भोगत आहेत. ऋतूंची उलटापालट अनुभवली की सामान्यतः झाडे लावण्याचा नारा दिला जातो. आजकाल लावलेली झाडे जगवली पाहिजेत याचीही जाणीव वाढलेली आढळते. ती स्वागतार्ह आहे. तथापि तेवढेच पुरेसे नाही. त्याला मानसिकता बदलाची जोडदेखील तितकीच महत्त्वाची नाही का?
सामान्य माणसे विविध पद्धतीने परिणाम आटोक्यात ठेवण्याला हातभार लावू शकतील. एकूणच मानवी जीवनशैली होता येईल तेवढी निसर्गपूरकतेकडे जाणे गरजेचे आहे. अन्यथा कचरा जाळायचा, शेतात राब भाजायचा, कळत-नकळत जलस्रोत प्रदूषणाला हातभार लावायचा, कचरा निर्माण करायचा, खासगी वाहनांचा वाढता वापर, वातावरणात उष्णता निर्माण करतील अशा गोष्टींचा स्वीकार याचा अवलंब करायचा हे योग्य ठरू शकेल का?
जागतिक स्तरावर सुमारे 193 देशांनी शाश्वत विकासाच्या 17 ध्येयांना मान्यता दिली आहे. त्यातील अनेक ध्येये साध्य करण्यासाठी माणसांचा सहभाग अपेक्षित आहे. उदाहरणार्थ, सर्वांना शुद्ध पाण्याची उपलब्धता आणि उपलब्ध साधनांचा जबादारीने वापर. जागतिक ते वैयक्तिक अशा पद्धतीने सूक्ष्म पातळीवर बदल व्हायला हवेत, असे जाणते म्हणतात. घातक सवयी कोणत्या ते समजून घेऊन त्यात बदल केले जायला हवेत. हवामान बदलाप्रती दुर्लक्ष हा त्यातील सर्वात मोठा अडथळा ठरू शकेल. ते आव्हान कसे पेलले जाऊ शकेल हाच कळीचा मुद्दा ठरू शकेल.