Tuesday, March 25, 2025
Homeअग्रलेखसंपादकीय : १ जानेवारी २०२५ - सांगा कसे जगायचे? 

संपादकीय : १ जानेवारी २०२५ – सांगा कसे जगायचे? 

आज एक जानेवारी 2025. अनेकांसाठी नवीन वर्षाचा पहिला दिवस. अनेकांनी अनेक संकल्प केले असतील. काहीजण संकलपूर्तीचाही संकल्प करतील. हे म्हणजे आठवण राहावी म्हणून उपरण्याला बांधलेल्या गाठीसारखीच अवस्था म्हंटली जाऊ शकेल का? आठवण राहावी म्हणून गाठ बांधायची आणि गाठ का बांधली हेच आठवत नाही. तशीच गत अनेकांच्या संकल्पांची होत असावी का? यातील गमतीचा भाग बाजूला ठेवला तरी आज सर्वांमध्ये संचारलेला उत्साह वर्षभर कायम राहू शकेल का याचा विचार करायला काय हरकत आहे?

जीवन कसे जगायचे असा प्रश्न कविवर्य मंगेश पाडगावकर विचारतात आणि पुढच्याच ओळीत त्याचा मार्गही सांगून जातात. सांगा कसे जगायचे..गाणी म्हणत की कण्हत..ते तुमच्यावरच अवलंबून आहे असे ठामपणे सुचवतात. परिस्थितीशरण माणसे कशालाही कारणे सांगतात आणि परिस्थितीला दोष देतात. व्यायाम करा-वेळ नाही.. फिरायला जा-पैसे नाही..क्षणभर विश्रांती घ्या-कामे कोण करणार..अशी त्यांच्या कारणांची यादी संपतच नाही. त्यामुळे वर्षाच्या कोणताही दिवस म्हणजे त्यांच्यासाठी मतेच ते आणि तेच तेफ असाच उगवला आणि मावळला तर त्यात नवल ते काय? पण पाडगावकर म्हणतात पेला अर्धा सरला आहे असे सुद्धा म्हणता येते आणि पेला अर्धा भरला आहे असे सुद्धा म्हणता येते त्याप्रमाणे चष्मा बदलला कि भोवतालचे रंग बदलतील.

- Advertisement -

समाजातील अनेक चांगल्या गोष्टी नजरेस पडू शकतील. अपंगत्वावर मात करून देशातील पदके कमावणारे खेळाडू भेटतील. एखादा अवयव नसला तरी हसतमुख चेहर्‍याने जगणारी माणसे दिसतील. माणुसकीचा धर्म निभावणारे सापडतील. भूक लागलेली असतांनाही घासातील घास देणारे दिसतील. रोजचा दिवस हसून साजरा करणार्‍यांचा परिचय होईल. संकटांवर मात करणार्‍या त्यांचेही आयुष्य चारचौघांसारखेच असते पण त्यातही आनंद शोधण्याची वृत्ती त्यांच्यात असते. म्हणूनच त्यांच्याही आयुष्यात तेच ते आणि तेच ते असले तरी त्यांचा प्रत्येक दिवस नव्याने उगवून मावळतो. ते संकटांना-अडचणींना सामोरे जातात. त्यावर सतत मात करण्याचा प्रयत्न करतात.

माणुसकी-मानवता-सामाजिक बांधिलकी-मदतीची वृत्ती पुरेपूर जोपासतात. म्हणूचच त्यांच्यासाठी परिस्थिती मफिटे अंधाराचे जाळे..झाले मोकळे आकाशफ अशी असते. आयुष्य काळ्या आणि पांढर्‍या रंगानी भरायचे की रंगीबेरंगी बनवायचे हे ज्याच्या त्याच्यावरच अवलंबून असते. एक कवी म्हणतो, एक सूर्यकिरण खोलीत उजळतो, एक मेणबत्ती अंधार पुसून टाकते, एक हसणे अंधकारावर विजय मिळवते, एक पाऊल प्रत्येक प्रवासाची नवी सुरुवात करते..पण तुम्ही बघा, हे सगळे तुमच्यावर अवलंबून आहे!! तेव्हा, आजपासून दृष्टिकोन बदलण्याचा संकल्प करू या आणि रोजचा दिवस नवीन दिवस म्हणून साजरा करण्याचा प्रयत्न तरी करूयात.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Sanjay Raut : “२०१४ मध्ये युती तोडण्यास…”; राऊतांनी फडणवीसांची बाजू घेत...

0
नाशिक | Nashik महाराष्ट्राच्या राजकारणात (Maharashtra Politics) मागील दशकभरात अनेक मोठ्या घडामोडी घडल्या आहेत. दोन दशकांहून अधिक काळ सोबती असलेल्या भाजप आणि शिवसेना (BJP and...