आज लक्ष्मीपूजन. घरोघरी तिचे उत्साह आणि आनंदात पूजन केले जाईल. लक्ष्मीचे पूजन म्हणजे समृद्धीचे पूजन. ती तर गरजेची आहेच. म्हणूनच कदाचित लक्ष्मीप्राप्तीसाठी माणसे त्यांचे आयुष्य वेळापत्रकाशी बांधून घेतात. तथापि भौतिक सुखसुविधांची प्राप्ती म्हणजेच समृद्धता मानली जाते. पण ते योग्य म्हटले जाऊ शकेल का? त्यापलीकडेही माणसाचे आयुष्य असते. ते आनंदाने जगण्यासाठी अनेक प्रकारची समृद्धतादेखील आवश्यक नसते का?
नात्यांची, मनाची, शारीरिक आणि मानसिक आरोग्याची समृद्धता माणसांचे आयुष्य समृद्ध करण्यात मोलाची भूमिका बजावते. मन अशांत असले, आरोग्य बिघडलेले असले, नाती विस्कटलेली असली तर केवळ आर्थिक समृद्धता माणसांना आनंदाची आणि समाधानाची प्राप्ती करून देऊ शकेल का? ज्याने त्याने वैयक्तिक पातळीवर या प्रश्नाचे उत्तर शोधले तरी त्याचे वैश्विक उत्तर नक्कीच ‘नाही’ हे असू शकेल. नात्यांची, मनाची, शारीरिक आणि मानसिक आरोग्याची समृद्धता कशी राखायची हे समजून घेण्याची सुरुवात या दिवाळीच्या निमित्ताने केली जाऊ शकेल.
या विविध प्रकारच्या समृद्धता प्राप्तीसाठी तिचे सिंचन करणे गरजेचे आहे. अहंकाराचा त्याग, विनयशीलता, आदर, नम्रता, एकमेकांना क्षमा करण्याची तयारी, संवादासाठी तत्परता, बदल स्वीकारण्याची तयारी, आपुलकीची उधळण, स्नेहाची पखरण, बिनशर्त प्रेम करणे यांचे सिंचन उपरोक्त समृद्धीप्राप्तीचा पाया ठरू शकेल. तीच शाश्वत सुख आणि समाधान प्राप्त करून देऊ शकेल. खरे तर हे सगळे गुण मानवी स्वभावात अंतर्भूतच नसतात का? सगळेच कधी ना कधी लहान मूल असतात.
देवाघरचे फूल असे लहान मुलाचे वर्णन केले जाते. कारण त्याचे निर्मळ मन. वाढत्या वयाबरोबर त्या मनावर विविध पुटे माणसेच चढवतात. तीच पुटे मग विविध प्रकारच्या समृद्धीप्राप्तीतील अडथळा बनतात. हा प्रवास कसा आणि कधी होतो ते माणसाच्या लक्षातसुद्धा येत नाही. ती पुटे काढून टाकण्याची सुरुवात यावर्षीपासून केली जाऊ शकेल. विचारांमध्ये, नात्यांमध्ये, आचारात पारदर्शकता राखली आणि जगणे सरळ सोपे ठेवले तर जगण्याचे गाणे होऊ शकेल. तेव्हा विविध प्रकारच्या समृद्धीच्या प्राप्तीचीदेखील आज कामना करूया.