कौटुंबिक ताणतणाव असह्य होत चालल्याचा दावा करत अनेक कुटुंबे न्यायालयाची पायरी चढतात. 2021 ते 2023 या तीन वर्षांत राज्यात दरवर्षी सुमारे 38 हजार खटले दाखल होतात. केंद्रीय विधी व न्याय खात्याने ही आकडेवारी माध्यमांत जाहीर केली आहे. हा चिंतेचा विषय आहे.
कौटुंबिक अस्वस्थतेचे कुटुंबावर आणि समाजावर विपरीत परिणाम होतात. कुटुंबे हा समाजाचा प्रमुख घटक मानला जातो. अनेक कुटुंबे मिळून समाज तयार होतो. परिणामी समस्येची कारणे शोधून त्यावर उपाय योजने ही जाणत्यांची आणि ते उपाय अमलात आणणे ही लोकांची जबाबदारी आहे. याबाबतीत जाणत्यांचे निरीक्षण काय सांगते? पती-पत्नीमधील वाढता अहंकार, नातेवाईकांचा अनावश्यक हस्तक्षेप, चढाओढ, आर्थिक अस्थिरता याचा परस्पर नात्यावर परिणाम होतो. विश्वासाला तडा जातो, असे समुपदेशक सांगतात.
नव्या पिढीत संयम कमी होत आहे. स्वातंत्र्य आणि समानतेचा चुकीचा अर्थ लावला जातो असे मत नागपूर कुटुंब न्यायायातील ज्येष्ठ वकील रेखा बारहाते व्यक्त करतात. परस्पर सामंजस्य आणि सन्मान जपला तर वाद कमी होतील, असेही त्या म्हणाल्या. या उणिवा दूर करण्याची निकड सर्वांना सारखीच जाणवण्याची गरज आहे. याचाच परिणाम समाजस्वास्थ्यावर देखील होतो. समाजात बालगुन्हेगारी वाढत आहे.
अडनिड्या वयाच्या मुलांचा सामाजिक गुन्ह्यात सहभाग आढळतो. पाचवीतील मुलाने दप्तरात पिस्तूल आणले आणि मित्राला गोळी घालून ठार केल्याची घटना नुकतीच बिहारमध्ये घडली. उद्ध्वस्त होत चाललेली कुटुंबव्यवस्था हे या समस्यांचे मूळ आहे. ज्याचे भयंकर परिणाम समाज अनुभवत आहे. काळानुसार जगण्याच्या पद्धतीत बदल अपरिहार्य आहेत. संयुक्त कुटुंबपद्धती छोटी होणे हे त्याचे चपखल उदहारण. त्याचे औचित्य पटवणारी कारणेही सांगितली जाऊ शकतात. तथापि त्याचा अर्थ मूल्ये बदलणे असा होऊ शकेल का? संयुक्त कुटुंबात भावभावनांचा निचरा घरातच होऊ शकायचा. अशी घरे सर्वांसाठी मूल्यांची शाळा होते.
मोठी माणसे संयम, सहनशीलता, प्रसंगी मौन पाळणे याचा पुरस्कार करायची. तर छोट्यांवर संस्कार आणि मूल्ये रुजवली जायची. मुलांचे ऐकून घेणारे हक्काचे कान घरातच होते. प्रेम, माया, आपुलकी, जिव्हाळा या भावनिक गरजांची पूर्तता आपोआपच व्हायची. चित्र फक्त छानच नसायचे. वाद, ताणतणाव आणि भांडणेही होती. तथापि ती संपवण्याचा विवेक काही जणांकडे तरी असायचा. तथापि कुटुंबे छोटी होताना या सगळ्या गोष्टींना पर्यायी व्यवस्था उभी करण्याच्या जबाबदार्यांचा मात्र विसर पडला असावा का? त्याची जाणीव समाजाला सातत्याने करून देण्याची जबाबदारी जाणत्यांची आहे. कारण स्वस्थ कुटुंबातूनच उत्तम मुले म्हणजेच उत्तम माणूस घडतो. कोणत्याही कारणांवरून ती प्रक्रिया थांबणे समाजाच्या हिताचे नाही हेच आकडेवारी दर्शवते.