राजकारणातील किंवा सत्ताकारणात महिलांचा सहभाग हा सामाजिक चर्चेचा आणि समाज माध्यमांवर काहीसा थट्टेचा विषय आढळतो. या मुद्याला धरून खिल्ली उडवणारा मजकूर किंवा चित्रे या माध्यमांवर फिरतात. काही विषय चर्चेसाठी कालातीत असावेत. उपरोक्त मुद्दा त्यातीलच एक असावा. एकविसाव्या शतकातही हा चर्चेचाच मुद्दा आहे यातच सगळे काही आले. तथापि महिलांना संधी मिळाली की त्या प्रभावी काम करून दाखवू शकतात हे देशाच्या 105 गावांमधील सुमारे 130 महिलांनी प्रत्यक्ष कृतीतून दाखवले.
एका सामाजिक संस्थेने या महिलांना सूर्यप्रकाशावर चालणारे दिवे (सोलर लाईट) घरावर बसवण्याचे प्रशिक्षण दिले. या महिलांनी सुमारे सव्वाशे गावांमधील घरांवर तसे दिवे बसवले. यात काही बिघाड झाल्यास त्याच महिला दुरुस्तीदेखील करतात. त्यांच्या या कार्यामुळे अनेक घरांमध्ये पहिल्यांदाच वीज पोहोचली. त्यांची कथा माध्यमांत नुकतीच प्रसिद्ध झाली. विदर्भातील तीन महिलांनी त्यांच्या गाव परिसरातील तलाव पुनरुज्जीवित केले. दैनंदिन जीवनात महिलांना अनेक समस्यांशी झुंजावे लागते.
पाणीटंचाई, दुष्काळ, महागाई, भारनियमन, खराब रस्ते अशा अनेक सामाजिक समस्यांचे दुष्परिमाण महिलांनाच जास्त सोसावे लागतात. त्यांना त्या समस्यांची जाणीव असते. त्या समस्यांचा सामना करण्याची किंवा त्यावर उपाय शोधू शकण्याची क्षमता महिलांमध्ये असू शकते. त्यांना संधी मिळाली तर त्या सिद्धही करू शकतात. केवळ उपरोक्तच नव्हे तर विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करून महिला तसा अनुभव समाजाला देतात. तथापि समाजात त्यांच्याबाबतीत केला जाणारा भेदभाव हा त्यातील एक मुख्य अडथळा मानला जातो. त्यांना नेहमीच गृहीत धरले जाते. निर्णय प्रक्रियेत त्यांचा सहभाग अजूनही नाकारला जातो.
प्रत्यक्ष व्यवहारात ‘त्यांना काय समजते.. ते त्यांचे काम नाही..त्यांनी स्वयंपाक करावा.. नको ती स्वप्ने बघू नयेत’ असेच त्यांना सतत ऐकवले जाते. तरीही अनेक महिला उमेद हारत नाहीत. अनेक जणी भेदभावाला आणि दुजाभावाला पुरून उरतात. असा अनेकींनी त्यांच्या कार्यकर्तृत्वाने त्यांची दखल घेण्यास भाग पाडले आहे. राष्ट्रीय ग्रामीण उपजीविका अभियानाअंतर्गत अनेक योजना राबवल्या जातात. त्यातून बचतगटांना पाठबळ दिले जाते. त्याचा फायदा महिलांचे अनेक बचतगट घेताना आढळतात. तात्पर्य, विविध पातळ्यांवर महिलांचा सहभाग आश्वासकता वाढवू शकतो. यामुळे ‘उम्मीद पर दुनिया कायम है’ हा आशावाद यामुळे समस्त महिलांच्या मनात निर्माण होऊ शकेल.