मानवतेला काळिमा फासणार्या अंधश्रद्धांच्या भुताची समाजाच्या मानगुटीवरची पकड किती घट्ट आहे, ते दर्शवणार्या अनेक घटना समाजात घडत असतात. अशाच तर्हेच्या तीन-चार घटना नुकत्याच उघडकीस आल्या आहेत. या सर्व घटना भूतबाधा, जादूटोणा आणि चेटूक-करणी अशा एकाच जातकुळीतील आहेत. जादूटोणा करीत असल्याच्या संशयावरून बिहारमध्ये एका कुटुंबातील पाच जणांना मारहाण करून जिवंत जाळण्यात आले.
कर्नाटक,शिवमोगात एका मुलाने आईचा जीव घेतला. आईला भूतबाधा झाल्याचा संशय त्याच्या मनात होता. यवतमाळमधील एका तथाकथित मांत्रिकाने मायलेकींना वर्षभर एका खोलीत डांबून ठेवले होते. त्यांच्यावर अघोरी उपचार केले. भूतबाधा झाली म्हणून त्या मांत्रिकाकडे गेल्या होत्या. नाशिकच्या मखमलाबाद परिसरात एका गृहनिर्माण संकुलातील घरांसमोर रात्री अस्थी आणि राख आणून टाकल्याचा प्रकार उघडकीस आला. अमरावती चिखलदरा परिसरातील एका गावात दहा दिवसांच्या बाळाला पोटफुगी झाली म्हणून विळ्याचे चटके दिले गेले.
पिंप्रीमधील एक भोंदूबाबा तर त्याच्या भक्तांचे खासगी क्षण बघत असल्याचा संतापजनक प्रकार उघड झाला. या सर्व घटना आणि अघोरी प्रकार संतापजनक आहेत. अंधश्रद्धांच्या भुताचा संचार अशा देशभर सुरू आहे. त्यातील काही घटना महाराष्ट्रातील असून राज्याच्या पुरोगामीत्वालाच त्या आव्हान देत आहेत. मपुढारलेले राज्यफ अशी महाराष्ट्राची देशात ओळख आहे. राज्याला संतांचा, समाजसुधारकांचा आणि शिक्षणप्रसारकांचा समृद्ध वारसा लाभला आहे. अंधश्रद्धांचा विळखा सैल करण्यासाठी त्यांनी आयुष्य वेचले. समाजातील अंधश्रद्धांवर कठोर प्रहार केले. समाज प्रबोधन केले. शिक्षणाने वैचारिक मानसिकता विकसित होते. त्या उद्देशाने लोकशिक्षण प्रसारावर भर दिला.
तरीही लोक शहाणे व्हायला आणि तर्कसंगत विचार करायला तयार नाहीत. त्यांना कोणतेच प्रश्न पडत कसे नाहीत? प्रश्नच पडत नसल्याने त्याची उत्तरे शोधण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. अंधश्रद्धेची झापडे लावलेल्या अशा लोकांचे वर्णन संतांनी एका भारुडात केले आहे. ‘वेड लागले… वेड लागले… या लोकांसी वेड लागले’ असे वर्णन संत करतात ते उगाच नव्हे! अंधश्रद्धा पसवणार्यांविरोधात सरकार कायद्याचा बडगा उगारते खरे, पण त्याबाबत समाजात पुरेशी माहिती नाही. अंधश्रद्धांबाबत पुरेशा प्रमाणात सामाजिक जागृती अजूनही झालेली नाही, हेच वर उल्लेखित घटनांवरून स्पष्ट होते.
अंमलबजावणी अभावी कायदा निष्प्रभ ठरतो. जादूटोणाविरोधी कायद्याचा प्रचार-प्रसार आणि अंमलबजावणीसाठी एक समिती आहे. त्या कार्यासाठी निधीही मंजूर केला जातो, पण कामाचे आदेशच निघत नाहीत, अशी व्यथा समितीचे अध्यक्ष शाम मानव जाहीरपणे व्यक्त करतात. या कायद्याचे नियम अजूनही स्पष्ट नाहीत, असे हमीद दाभोलकर सांगतात. ‘बिनदाताचा सिंह’ कोणाची शिकार करू शकेल का? अनेक सामाजिक संस्थांचे कार्यकर्ते अंधश्रद्धांवर प्रहार करून समाज जागृतीचे काम करतात. अंधश्रद्धांचा काळोख जाऊन समाजात डोळसपणाचा प्रकाश कधी ना कधी पडेल, अशी खात्री त्यांना वाटते. त्यांना कायद्याचे बळ देणे सरकारचे नैतिक कर्तव्य आहे. त्या कर्तव्याची जाणीव होऊन सरकारी यंत्रणा कृतिशील होण्यासाठी आणखी किती जण अंधश्रद्धांचे बळी ठरावेत, असे सत्ताधार्यांना वाटते?




