महानगरपालिका शाळेतील निवडक विद्यार्थ्यांना नासाची सफर घडवण्याचा निर्णय नाशिक महानगरपालिकेने घेतला आहे. याच शाळांमधील काही विद्यार्थ्यांनी नुकतीच भारतीय अंतराळ संशोधन संस्थेलाही (इस्रो) भेट दिली. संस्थेचे विविध विभाग त्यांनी पाहिले. प्रश्नोत्तराचा कार्यक्रमही पार पडला. विद्यार्थ्यांच्या वैचारिक कक्षा विस्तारणार्या या उपक्रमाचे पालक स्वागत करतील. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासात शैक्षणिक उपक्रमांचे महत्व अनन्यसाधारण मानले जाते.
राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात देखील ते नमूद आहे. अशा भेटी शिक्षणातील, त्या त्या विषयातील रुची वाढवू शकतील. विद्यार्थ्यांना प्रश्न पडू शकतील. ते विचारण्याचे धाडस निर्माण होऊ शकेल.अभ्यासू व त्या क्षेत्रातील अधिकारी व्यक्तींकडून उत्तरे मिळण्याची संधी देखील मिळू शकेल. त्यातुनच अधिक अभ्यासाची प्रेरणा निर्माण होऊ शकेल. सखोल अभ्यासाचे महत्त्व त्यांच्या मनावर ठसू शकेल. शिक्षण म्हणजे केवळ माहिती मिळवण्याची प्रक्रिया नाही तर त्यातून विद्यार्थ्यांची वैचारिक दृष्टी विकसित होणे अपेक्षित आहे. इस्रो किंवा नासासारख्या संस्थांच्या भेटींमधून वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवण्याची सुरुवात होऊ शकेल.
विद्यार्थ्यांच्या एका भेटीची ही काव्यकल्पना किंवा कवित्व अजिबात नाही. कोणता प्रसंग किंवा क्षण विद्यार्थ्यांना सखोल अभ्यासाची प्रेरणा देऊ शकेल हे कोणीच सांगू शकणार नाही. अनेक थोर आणि मान्यवर व्यक्ती त्यांच्या आयुष्यातील ‘टर्निंग पॉईंट’विषयी बोलतात. मेरी कोम, महेंद्रसिंग धोनी, शकुंतला देवी, मिल्खासिंग अशा असंख्य प्रेरणादायी व्यक्तिमत्वाच्या जीवनावर सिनेमा बनतात. जागतिक पातळीवर यश मिळवल्यावर विद्यार्थ्यांमध्ये विविध खेळांची लोकप्रियता वाढते. ते काय असते? डॉ.ए.पी.जे अब्दुल कलाम यांचा प्रभाव असंख्य विद्यार्थ्यांवर पडला.
विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाची आवड निर्माण होण्याचे निमित्त ठरला. किंबहुना त्यामुळे देखील विद्यार्थाना भेटायला आणि त्यांच्या रमायला मला आवडते असे ते म्हणत. प्रभाव व्यक्तीचा, संस्थेच्या कार्याचा किंवा तज्ज्ञांचा भेटीचा असो, तो विद्यार्थ्यांना प्रेरित करू शकेल. मुलांना वैज्ञानिक दृष्टी प्रदान करेल. या क्षेत्राकडे त्यांचा कल वाढेल. कदाचित पुढे प्रगती करण्याचे मार्गही गवसतील. संधी मिळाली तर तिचे सोने बनवण्याच्या दिशेने प्रवास सुरु होऊ शकतो. तेव्हा अशा भेटींकडे केवळ एक उपक्रम म्हणून न पाहता व्यापक दृष्टिकोनातून त्यांचे मूल्यमापन केले जायला हवे.