गोदावरीसह राज्यातील अन्य तीन नद्या प्रदूषणमुक्त करण्यासाठी कृती आराखडा तयार केल्याची घोषणा सरकारने नुकतीच केली. ती ऐकून ना गोदावरीच्या पाण्यावर तरंग उठला ना नाशिककरांना हायसे वाटले. कारण याआधीही सरकारने अशा घोषणा अनेक वेळा केल्या आणि त्या फक्त पोकळ वल्गनाच ठरल्या. त्याला नाशिककर चांगलेच वैतागले आहेत.
यापुढे सरकारने गोदावरी स्वच्छतेशी संबंधित कोणतीही नवीन घोषणा नाही केली तरी चालेल, पण आधी केलेल्या अनेक घोषणांपैकी एकतरी अंमलात आणावी अशीच भावना नाशिककर व्यक्त करतात. असे अनेक निर्णय जाहीर होतात. त्यासाठी निधीही मंजूर झाल्याचे सांगितले जाते. तसे केल्याबद्दल पाठही थोपटून घेतली जाते. पण गोदावरीचे पात्र मात्र अस्वच्छच वाहते. हा मुद्दा घेऊन सामाजिक कार्यकर्ते वारंवार न्यायालयात जातात. याचिकांची सुनावणी होते. त्यावर न्यायसंस्था आदेश देते.
तथापि राजकीय आणि सामाजिक इच्छाशक्तीच्या अभावी ते आदेश गोदापात्रात वाहून जातात. कार्यकर्ते मात्र त्यांच्या खिशाला खार प्रयत्न करतच राहतात. असा मिळून सार्यांचा वेळ पाण्यात जातो. तरीही प्रशासन मात्र ढिम्मच. वारंवार आदेश देऊनही गोदापात्रातील काँक्रिट काढले जात नाही. जिवंत पाण्याचे स्रोत मोकळे केले जात नाहीत. तिच्या दुतर्फा असलेले अतिक्रमण काढले जात नाही. उलट गांधी तलावात बांधकाम सुरू आहे. सांडपाणी प्रक्रिया केंद्रांची संख्या वाढत नाही. अस्तित्वात आहेत ती केंद्रे कार्यक्षमतेने चालतात की नाही ते माहीत नाही.
परिणामी गोदापात्रात सांडपाणी आणि मलजल ठिकठिकाणी मिसळते. परिणामी पाणी प्रदूषित होते. पात्र पाण्याची की फेसाची अशीच अवस्था आढळते. गोदापात्रात कचरा टाकू नका, निर्माल्य फेकू नका, गाड्या आणि कपडे धुवू नका असे आवाहन प्रशासन वारंवार करते. नियम भंग करणार्या नागरिकांना कारवाईला सामोरे जावे लागते. नागरिकांनी सामाजिक भान राखायला हवेच. पण प्रशासनाचे काय? गोदा स्वच्छतेबाबत त्यांच्या पोकळ वल्गना आणि पालथ्या घड्यावर पाणी ओतणे संपतच नाही.
नागरिकांच्या डोळ्यांत धूळ फेकणे सुरूच आहे. समस्येच्या मुळाशी घाव घातला जात नसल्याने गोदावरीसाठी राबवल्या जाणार्या स्वच्छता मोहिमादेखील अर्थहीन ठरतात. त्याही फक्त छायाचित्रापुरत्या राबवल्या जाऊ लागल्या असतील तर त्याचा दोष फक्त राबवणार्यांना देऊन भागेल का? प्रसिद्धीच्या सोसापुरत्या अशा मोहिमा राबवल्या जाऊ नयेतच.
पण सकाळी स्वच्छ केलेले पात्र काही वेळाने पुन्हा सांडपाण्याने भरून वाहणार असेल तर सामान्य लोकांचा उत्साह मावळला तर नवल ते काय? एकुणात काय तर इच्छाशक्तीअभावी गोदावरी प्रदूषणमुक्त होत नाही आणि नागरिकांच्या आरोग्याशी खेळ थांबत नाही. त्यात एका नव्या घोषणेची भर पडली इतकेच.