Sunday, September 29, 2024
Homeअग्रलेखसंपादकीय : १० सप्टेंबर २०२४ - जलसंवर्धनाची त्रिसूत्री

संपादकीय : १० सप्टेंबर २०२४ – जलसंवर्धनाची त्रिसूत्री

पाण्याचा बेसुमार वापर करण्याची प्रवृत्ती संपुष्टात आणण्याची आणि पाण्याची बचत करण्याची गरज पंतप्रधानांनी पुन्हा एकदा प्रतिपादित केली आहे. पाण्याची बचत ही काळाची गरज आहे. त्यासाठी पाण्याचे पुनर्वापर, पुनर्प्रक्रिया आणि पुनर्भरण या त्रिसूत्रीचा स्वीकार माणसाने केला पाहिजे हे त्यांनी आवर्जून सांगितले.

पंतप्रधानांनी महत्वाच्या सामाजिक समस्येकडे लोकांचे लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न केला आहे. देशात दुष्काळ आणि पूर अशी दोन टोके नेहमीच अनुभवास येतात. आयपीई ग्लोबल आणि इएसआरआय इंडिया या दोन संस्थांनी हवामान बदलाच्या प्रभावाचा अभ्यास केला. भारतातील सुमारे 80 टक्क्यांपेक्षा जिल्हे एकाच वेळी पूर, दुष्काळ आणि चक्रीवादळाने प्रभावित होत आहेत असा निष्कर्ष त्यांनी नोंदवल्याचे वृत्त माध्यमात प्रसिद्ध झाले आहे. तोच अनुभव देशाच्या अनेक भागातील नागरिक घेत आहेत. दिवस हंगामी पावसाचे आहेत.

- Advertisement -

अनेक भागात पूरसदृश परिस्थिती आहे तर काही ठिकाणी पावसाने ओढ दिली आहे. काही दिवसात पावसाचा परतीचा प्रवास सुरु होईल. पावसाळ्यात धो धो पाऊस आणि त्यानंतरच्या काही दिवसात पाणीटंचाई अशी स्थिती अनेक गावे अनुभवतात. महाराष्ट्र राज्यही त्याला अपवाद नाही. शिवाय पृथ्वीवरील पाणीसाठा हळूहळू कमी होत आहे. संपूर्ण जगात जेवढा उपयोगी पाणीसाठा आहे त्यापैकी फक्त चार टक्के पाणी भारतात उपलब्ध आहे असे पंतप्रधानांनीही सांगितले.

जगात तिसरे महायुद्ध झालेच तर ते पाण्यावरून होण्याचा धोका असल्याचा इशारा जागतिक तज्ज्ञ देतात. भूगर्भातील जलपातळी उणावत आहे. जवळपास 72 टक्के पाणी संपले असल्याचे आणि देशातील सुमारे 270 जिल्हे दुष्काळी झाले असल्याचे जलतज्ज्ञ राजेंद्रसिह सांगतात. या परिस्थितीवर मात करायची असेल तर पाण्याचे पुनर्वापर, पुनर्प्रक्रिया आणि पुनर्भरण या त्रिसूत्रीला पर्याय नाही. पाण्याचा विवेकी वापर आणि बचत हा त्या त्रिसूत्रीचाच एक भाग आहे. जो सामान्य माणसे सहज अंमलात आणू शकतात.

विशेषतः शहरी भागात मुबलक पाणी उपलब्ध असते. परिणामी त्या परिसरात पाण्याची उधळपट्टी करणार्‍या अनेक सवयी आढळतात. त्या कोणत्या आहेत हे माणसे जाणून आहेत. ते आता वेगळे सांगण्याची गरज नाही. त्या सवयींमधील बदल पाणी बचत तर करेलच. पण माणसांनी केलेल्या छोट्याशा बदलाची व्यापकता मोठी असेल. जलसंवर्धन होईल. त्यांच्या पुढच्या पिढीला पाणी उपलब्ध होऊ शकेल. लहान मुलांचे पालक हेच पहिले शिक्षक असतात. त्यांच्याकडे बघून मुले अनेक गोष्टी शिकतात. त्यांच्याकडे पाणीबचतीचा सवयीचा वारसा आपोआप सोपवला जाऊ शकेल. ती सवय त्यांना आपुसकच जडेल. त्यांच्या भविष्यकाळाचा दृष्टीने जी अत्यंत महत्वाची असेल. कारण जल हेच जीवन आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या