Friday, April 11, 2025
Homeसंपादकीयसंपादकीय : ११ एप्रिल २०२५ - पद्धत चुकीचीच

संपादकीय : ११ एप्रिल २०२५ – पद्धत चुकीचीच

घोटीच्या एका शाळेतील एक ध्वनीचित्रफीत सध्या समाजमाध्यमांवर फिरत आहे. मुलांना शिस्त लावण्याचा अनोखा उपक्रम म्हणून ती अन्य शाळांनाही पाठवावी, असे आवाहन करणार्‍या ओळी त्यात आढळतात. बर्‍याच जणांनी ती पाहिलीही असेल. याबाबतीत समजलेली हकीकत अशी की, शिक्षकांनी मुलांचे दप्तर तपासल्यावर आठवी-नववीच्या काही विद्यार्थ्यांच्या दप्तरांमध्ये काही आक्षेपार्ह वस्तू सापडल्या. तसेच, मुलांची केसांची ठेवण शाळेच्या विद्यार्थ्यांना साजेशी नसल्याचे आढळले. त्यानंतर शिक्षकांनी त्यांचे केस शाळेतच सगळ्या विद्यार्थ्यांसमोर कापल्याचे आणि मुलांना शाळेतील इतर विद्यार्थ्यांसमोर उभे करून अनेक प्रश्न विचारले गेल्याचे त्यात दिसते. त्या मुलांचे कृत्य समर्थनीय नाहीच. त्यावर त्यांना जाबही विचारला पाहिजे व शिस्तही लावली पाहिजे.

मात्र, त्यामागचा उद्देश मुलांची चूक सुधारून त्यांना शिक्षणप्रवाहात परत रुजवणे हाच असला पाहिजे. मात्र, ज्या पद्धतीने शिक्षक प्रश्न विचारत आहेत, ज्या पद्धतीने सर्वांसमोर त्यांचे केस कापले गेले, ते करताना खडे बोल सुनावले गेले ते कुठल्याच पद्धतीने मुलांना समजावणे, समजवून घेणे आणि सुधारण्यासाठी वाटले नाहीत. त्याउलट मुलांना हिणवणे व अपमानित करणे असा हेतू वाटला. ज्या पद्धतीने शिक्षकाने शिक्षणमंत्र्यांचा उल्लेख केला, त्यांचा धाक मुलांना दाखवला व मुलांच्या आणखी चुका प्रखरपणे कॅमेर्‍यासमोर दाखवल्या. त्यातून शिक्षकांचा हेतू हिरो बनणे असाच वाटत होता. मुळातच तेरा-चौदा वर्षांची पौगंडावस्थेतील मुले शारीरिक व मानसिक स्थित्यंतरांमधून जात असतात. या वयात त्यांचा स्वत्वाचा शोध सुरू असतो.

- Advertisement -

प्रतिकूल परिस्थिती, समाजमाध्यमांचा नको असलेला पगडा, त्यांच्या भोवतालचे वातावरण, त्यांची सामाजिक,आर्थिक, कौटुंबिक परिस्थिती या सगळ्याचा परिणाम मुलांवर होत असतो. या वयोगटाला शिकवणार्‍या शिक्षकांना याची पूर्णपणे जाणीव असणे अपेक्षितच आहे. कारण त्यांच्या शिक्षण प्रशिक्षणामध्ये मुलांचे शारीरिक, मानसिक बदलांसहित मुलांना कसे हाताळायचे याचा अभ्यास झालेला असणे व त्याच पद्धतीने मुलांना हाताळणे देखील अपेक्षित आहे. मात्र, समाजमाध्यमांमध्ये हिरो बनण्याचा मोह या शिक्षकांना देखील आवरता आलेला दिसत नाही. सध्याच्या काळात मुलांचा आत्मसन्मान, अहंकार मुळातच जागरूक झालेला असतो. अशातच समवयस्क व समाजमाध्यमांसमोर मुलांना हीन वागणूक देऊन अपमानित करण्याचा त्यांच्या व्यक्तिमत्वावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता असते. त्याचे खोल परिणाम त्यांच्या पुढील आयुष्यात दिसू शकतात.

मुले मनात राग धरू शकतात. विद्रोह करू शकतात. असलेल्या त्यांच्या स्थितीमधून आणखी वाईट स्थितीत जाऊ शकतात. मात्र, या मुलांना विश्वासात घेऊन त्यांनी केलेले कृत्य का केले, सभोवतालची परिस्थिती कशी आहे, मित्रमंडळी व समाजमाध्यमांचा त्यांच्यावर विपरीत प्रभाव आहे का हे जाणून घेऊन शिक्षकांनी समुपदेशन केले असते तर बरे झाले नसते का? समजा, त्या मुलांकडून वारंवार शिस्तभंग होत असेल तर शालेय नियमानुसार त्यांच्यावर कारवाई करता आली असती. मात्र, व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये जे दिसत आहे ते शिक्षकांकडून अपेक्षित नसून मुलांचे भवितव्य आणखी बिघडवण्याची शक्यता निर्माण करणारे आहे. याबाबत या शिक्षकांची चौकशी का होऊ नये?

या मुलांनी काय चुका केल्या याचा तपशील त्यांच्याकडे आहे का? चुका गंभीर असतील तर शाळेने नियमानुसार काय कारवाई केली याच्या नोंदी उपलब्ध आहेत का? हे सगळे जाणून घेणे महत्वाचे ठरेल अशा पद्धतीने स्वतःच हिरो बनण्याचा मोह टाळता येऊ शकला असता का? तसे नसते तर व्हिडीओ बनवून ते समाजमाध्यमांवर फिरले असते का? या सर्व बाबींचा विचार होणे आवश्यक आहे. मुलांच्या चुका असतील तर त्यांना सुधारवण्याचे काम शिक्षकांनी केले पाहिजे. शिस्तही लावणे गरजेचे आहे. मात्र, ती योग्य पद्धतीने व्हायला हवी. या घटनेतील शिक्षकांचा उद्देश विद्यार्थ्यांसाठी चांगला असला असे मानले तरीही पद्धत वेगळी असूच शकली असती.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Ahilyanagar : भिक्षेकरूंच्या मृत्यूप्रकरणी जिल्हा रुग्णालयाची सावध भूमिका

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar जिल्हा रुग्णालयात दाखल केलेल्या चार भिक्षेकरुंचा उपचार सुरू असताना झालेल्या मृत्यूनंतर शिर्डीतील भिक्षेकरुंचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. यावरून राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू...