Thursday, January 8, 2026
Homeअग्रलेखसंपादकीय : ११ डिसेंबर २०२४ - तिचा पुढाकार स्वागतार्ह

संपादकीय : ११ डिसेंबर २०२४ – तिचा पुढाकार स्वागतार्ह

समाजात मानसिक विकृती वाढत आहे. मुली आणि महिलांवर अत्याचाराची रोज एक घटना तरी उघडकीस येते. गुन्हेगारांना वयाची मर्यादादेखील कळेनाशी झाली आहे. अजाण बालिकेपासून वयोवृद्ध महिला त्याला बळी पडताना आढळतात. त्यादृष्टीने सामाजिक सुरक्षित वातावरण आणि गुन्हेगारांना जबर धाकनिर्मिती ही निःसंशय सरकारचीच जबाबदारी आहे. सरकार ती पार पाडण्यात यशस्वी होते आहे असे म्हणायचे धाडस जाणतेदेखील करणार नाहीत अशीच सद्यस्थिती आहे.

परिणामी मुली आणि महिलांनी स्वतःला सक्षम बनवणे अपरिहार्य आहे. ही गरज नाशिक जिल्ह्यात सटाणा तालुक्यातील भाक्षी या गावातील एका विद्यार्थिनीला जाणवली असावी. परिस्थिती बदलण्यासाठी तिने तिच्या परीने पुढाकार घेतला. तिने महिला सुरक्षा अ‍ॅप बनवले आहे. हे अ‍ॅप इतर सुरक्षा अ‍ॅपसारखेच काम करते, असे प्रसिद्ध झालेल्या वृत्तात म्हटले आहे. कोणतेही सुरक्षा अ‍ॅप कसे काम करते हे निदान मुलींना सांगण्याची तरी आवश्यकता नसावी. हे अ‍ॅप प्रायोगिक असू शकेल. याबाबत तिला अधिक मार्गदर्शनाची गरजदेखील असू शकेल. तथापि तिला महिलांवरील संकटांची जाणीव झाली आणि त्यात सुधारणा करण्यासाठी पुढाकार घ्यावासा वाटला हे जास्त महत्त्वाचे आहे.

- Advertisement -

लोकसहभागाने कोणत्याही सामाजिक समस्येवर उत्तर शोधले जाऊ शकते, हेच तिने तिच्या कृतीतून अधोरेखित केले. महिलांवरही अत्याचाराची एखादी घटना घडली की समाजात खळबळ माजते. लोक रस्त्यावर उतरतात. अनेक सामाजिक संस्था मुलींना सक्षम बनवण्यासाठी वर्ग चालवतात. तथापि ते वर्ग निरंतर सुरू राहिल्याचे क्वचितच आढळते. एखादे काम सातत्याने सुरू ठेवण्यातील सामाजिक संस्थांची मर्यादाही लक्षात घेण्यासारखी असू शकेल. अशा वर्गांच्या माध्यमातून स्वसक्षमतेची जाणीव महिलांना होणे आवश्यक असते. ती झाली की त्यांना स्वसंरक्षणाचे तंत्र शिकवणारे अनेक मार्ग सापडू शकतील. ते तंत्र कुठे आणि कसे वापरायचे याचा विवेकही स्वप्रयत्नातून त्यांच्यामध्ये रुजू शकेल.

YouTube video player

कारण तंत्राइतकाच तोही महत्त्वाचा आहे. सध्याही असे अनेक सुरक्षा अ‍ॅप कार्यरत असू शकतील. पोलिसांचेही असेच एक अ‍ॅप आहे. संकट आल्यास पीडिता संपर्क साधू शकतील असे अनेक क्रमांकदेखील पोलीस विभाग सातत्याने जाहीर करतो. त्याबाबतीत किती मुली सजग असतात? त्यांच्या मोबाईलमध्ये सुरक्षा अ‍ॅप डाऊनलोड असतात? पोलिसांनी दिलेले नंबर त्यांनी नोंदवलेले असतात? याही पातळीवर जाणीव जागृतीची गरज भासते. येनकेन प्रकारे अनावस्था प्रसंगांचा धैर्याने सामना करण्याची क्षमता मुलींमध्ये असण्याला पर्याय नाही हे मात्र नक्की खरे.

ताज्या बातम्या

Shrirampur : श्रीरामपुरात पोलीस पथकावर जमावाचा हल्ला

0
श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur श्रीरामपुरातील वार्ड नं.1 इराणी गल्ली परिसरात शासकीय कर्तव्यावर असलेल्या पोलीस पथकावर हल्ला करण्याची, जमावाला भडकावून आरोपी सोडवण्याची आणि कोयत्याने जीवे मारण्याचा प्रयत्न...